दिल्ली: शाहीन बाग परिसरातून ५० किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय ३० लाख रुपयांची रोकड, नोटा मोजण्याची मशीनदेखील हस्तगत करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची किंमत ४०० कोटी रुपयांच्या आसपास आहे. एनसीबीनं ही कारवाई केली आहे. जप्त करण्यात आलेलं ड्रग्ज अफगाणिस्तानातून आणण्यात आलं होतं.
इंडो-अफगाण सिंडिकेटच्या माध्यमातून अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री सुरू होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. अफगाणिस्तानातून आणण्यात आलेलं हेरॉईन फ्लिपकार्टच्या पॅकिंगमध्ये बंद होतं. या सिंडिकेटचे धागेदोरे उत्तर प्रदेश, पंजाबपर्यंत जात असल्याचं समजतं. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
ड्रग्ज तस्करीच्या एका मोठ्या सिंडिकेटचा पर्दाफाश करण्यात एनसीबीला यश आलं. या सिंडिकेटमध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतीय व्यक्तींचा समावेश आहे. दिल्लीतील शाहीन बाग आणि जामिया परिसरात छापे टाकण्यात आले. यावेळी एका घरातून ५० किलो हेरॉईन आणि ४७ किलो संशयास्पद नार्कोटिक्स हस्तगत करण्यात आले. सोबतच ३० लाखांची रोकड आणि नोटा मोजण्याची मशीनही जप्त करण्यात आली.