नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प भारताच्या दौऱ्यासाठी फारच उत्साहित दिसत आहेत. सध्या ट्रम्प करत असलेल्या वक्तव्यावरून त्यांचा उत्साह स्पष्ट दिसून येते आहे. ट्रम्प यांनी एका सभेत दावा केला की, अहमदाबाद येथे त्यांच्या स्वागतासाठी दहा मिलीयन अर्थात एक कोटी भारतीय उपस्थित राहणार आहेत. याआधी ट्रम्प यांनीच 50 लाख आणि 70 लाख लोक उपस्थित राहणार असल्याचा दावा केला होता. तो आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
अमेरिकेतील कोलराडो येथे आयोजित सभेत ट्रप्प बोलत होते. ट्रम्प म्हणाले की, भारतात माझ्या स्वागतासाठी तब्बल 10 मिलियन लोक उपस्थित राहणार आहेत, असं मी ऐकलं आहे. स्टेडीयमवर हे लोक जमणार असून ही संख्या 60 लाख ते एक कोटीपर्यंत असू शकते. त्यांनी पुढे सांगितले की, भारतात माझ्या स्वागतासाठी ऐवढी गर्दी असेल जणू मी बीटल्स प्रमाणे लोकप्रिय झालो. एवढ्या गर्दीने स्टेडीयम फुल भरणार असून लोकांना बाहेर उभं राहवे लागेल, असंही ट्रम्प म्हणाले.
याआधी ट्रम्प यांनी भारतातील त्यांच्या स्वागतासाठीच्या गर्दीसंदर्भात वक्तव्य केले होते. एका ठिकाणी त्यांनी 50 लाख भारतीय उपस्थित राहणार असल्याचे म्हटले होते. तर दोन दिवसांपूर्वी 70 लाख आकडा सांगितला. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत गेले होते, तेंव्हा झालेल्या कार्यक्रमात 50 हजार लोक उपस्थित होते. अमेरिकेत कार्यक्रमासाठी जमणाऱ्या गर्दीच्या तुलनेत 50 हजार हा आकडा मोठा होता.
दरम्यान ट्रम्प यांच्याकडून गर्दीचे वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. मात्र अहमदाबाद महानगर पालिकेने म्हटल्यानुसार ट्रम्प यांच्या रोडशो वेळी एक लाखाहून अधिक लोक उपस्थित राहतील. तर स्टेडियमवर होणाऱ्या कार्यक्रमात देखील एवढीच संख्या राहणार आहे.