उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी राज्यात नवी लोकसंख्या नीति (Population Bill) आणण्याची घोषणा केली आहे. योगींच्या लोकसंख्या नियंत्रण कायद्याबाबतची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पण योगींचं हे पाऊल त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण नव्या लोकसंख्या नियंत्रण कायद्यानुसार तीन किंवा त्यापेक्षा अधिक अपत्य असणाऱ्यांना निवडणुकीला उभं राहता येणार नाही. यामुळे उत्तर प्रदेशच्या विधानसभेतील भाजपच्या एकूण आमदारांपैकी ५० टक्के आमदार अपात्र ठरतील अशी माहिती समोर आली आहे. (50 percent of UP BJP MLAs have 3 or more kids would get disqualified if Population Bill gets implemented)
उत्तर प्रदेश विधानसभेकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्याच्या अधिकृत वेबसाइट्सवर एकूण ३९७ विधानसभा सदस्यांची वैयक्तिक माहिती अपडेट करण्यात आलेली आहे. यातील ३०४ सदस्य सत्ताधारी भाजपचे आहेत आणि त्यात १५२ आमदार म्हणजेच निम्म्या आमदारांना तीन किंवा त्याहून अधिक अपत्य आहेत.
लोकसंख्या नियंत्रणाचा प्रस्ताव आणणाऱ्या भाजप खासदाराला किती मुलं? नेटकऱ्यांनी शोधून काढलं
इतकंच नव्हे, तर भाजपच्या एका आमदाराला ८ अपत्य आहेत. तर आणखी एका आमदाराला ७ अपत्य आहेत. याशिवाय ८ आमदारांना प्रत्येकी ६ अपत्य आहेत. तर १५ सदस्यांना प्रत्येकी ५ अपत्य आहेत. सत्ताधारी भाजपच्या एकूण आमदारांपैकी ४४ आमदारांना प्रत्येकी ४ अपत्य आहेत. तर ८३ आमदारांना प्रत्येकी ३ अपत्य आहेत. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू झाल्यास हे सर्व विधानसभा सदस्य नियमानुसार अपात्र ठरू शकतात.
दरम्यान, लोकसभेत देखील लोकसंख्या नियंत्रण कायद्याचं विधेयक मांडली जाण्याची दाट शक्यता आहे. यात गोरखपूरचे खासदार रवी किशनदेखील लोकसंख्या नियंत्रणाबद्दल खासगी विधेयक मांडणार असल्याचं सांगितलं जात आहे. पण खुद्द रवी किशन यांनाच चार अपत्य आहेत. त्यामुळे त्यांचं नाव पुढे येताच सोशल मीडियात जोरदार चर्चा रंगली. लोकसंख्या नियंत्रणाचा आग्रह धरणाऱ्या रवी किशन यांनाच ४ मुलं आहेत, याकडे अनेकांनी लक्ष वेधलं. काहींनी रवी किशन यांचा कुटुंबासोबतचा फोटो ट्विट केला, तर काहींनी या परिस्थितीला दिव्याखाली अंधार म्हणत खिल्ली उडवली.