नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी प्राप्तिकर विवरणासाठी दिलेल्या निकालामुळे पॅन क्रमांक (परमनंट अकाउंट नंबर) व आधार क्रमांक एकमेकांना जोडणे (लिंक करणे) बंधनकारक बनले आहे. मात्र आतापर्यंत ५0 टक्के लोकांनी आधार व पॅन लिंक केले नसल्याचे आढळून आले आहे.प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २१ कोटी ८ लाख १६ हजार ७७६ लोकांनी पॅन व आधार एकमेकांना जोडले आहे. प्रत्यक्षात पॅन कार्डधारकांची संख्या ४१ कोटी २६ लाख ६९६८ इतकी आहे. म्हणजे २0 कोटींहून अधिक लोकांनी पॅन व आधार एकमेकांना लिंक केलेले नाही, असा अर्थ निघतो. अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) पॅन क्रमांक व आधार क्रमांक एकमेकांशी जोडण्याची मुदत ३१ मार्च २0१९ पर्यंत वाढवून दिली आहे. तसे ३0 जून रोजी जाहीर करण्यात आले होते. तोपर्यंत ते काम संबंधित पॅन कार्डधारकांना करावेच लागणार आहे. मात्र आधारचा फैसला होईपर्यंत पॅन व आधार जोडण्यास मुदतवाढ देण्याचे मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयानेच जाहीर केले होते. आता न्यायालयाचा निर्णय आला असून, त्यात हे करणे बंधनकारक केले आहे. प्राप्तिकर कायदा विवरणपत्रात आधार क्रमांक देणे सक्तीचे केले होते. त्यात १ जुलै २0१७ रोजी ज्यांच्याकडे पॅन आहे आणि जे आधार क्रमांकासाठी पात्र आहेत, त्यांनी आधार क्रमांक प्राप्तिकर विभागाला कळविणे बंधनकारक केले होते.पाच वेळा मिळाली मुदतवाढदेशात असलेल्या ४१ कोटींहून अधिक पॅन कार्डधारकांपैकी ४0 कोटी १ लाख पॅन कार्ड व्यक्तींच्या नावे आहेत. अन्य म्हणजे सुमारे १ कोटी पॅन कार्डधारक या कंपन्या व अन्य करदाते आहेत. आधार क्रमांक व पॅन क्रमांक जोडण्याची मुदत सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार पाच वेळा वाढवून देण्यात आली होती.
५0 टक्के लोकांनीच केला आधार क्रमांक पॅनला लिंक! आता करणे अनिवार्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 5:19 AM