काँग्रेसमध्ये ५०% आरक्षण; कार्यकारिणीत अर्धी पदे एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याकांना 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 05:59 AM2023-02-26T05:59:28+5:302023-02-26T05:59:50+5:30

पक्षाचे माजी अध्यक्ष, माजी पंतप्रधानांना स्थायी सदस्यत्व

50% reservation in Congress; Half of the posts in the executive are for SCs, STs, OBCs, minorities | काँग्रेसमध्ये ५०% आरक्षण; कार्यकारिणीत अर्धी पदे एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याकांना 

काँग्रेसमध्ये ५०% आरक्षण; कार्यकारिणीत अर्धी पदे एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याकांना 

googlenewsNext

आदेश रावल 
लोकमत न्यूज नेटवर्क 
रायपूर : रायपूर येथे सुरू असलेल्या काँग्रेस महाअधिवेशनात शनिवारी प्रमुख सुधारणांचे सहा प्रस्ताव मांडण्यात आले. यावेळी कार्यकारिणीत ५० टक्के आरक्षणाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे, ज्यामध्ये एससी, एसटी, अल्पसंख्याक, महिला, तरुण आणि ओबीसी यांना आरक्षण दिले जाईल, तर ५० टक्के हिस्सा आरक्षित नसेल. 

दुसऱ्या दुरुस्तीमध्ये काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यांची संख्या २३ वरून ३५ करण्यात आली. यातील १८ सदस्य निवडून येतील आणि १७ सदस्यांना काँग्रेस अध्यक्ष नामनिर्देशित करू शकतील. याशिवाय माजी अध्यक्ष, माजी पंतप्रधान, राज्यसभा आणि लोकसभेतील काँग्रेस नेत्यांना काँग्रेस कार्यकारिणीचे स्थायी सदस्य बनविण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे. काँग्रेस प्रथमच डिजिटल मेंबरशिप सुरू करणार आहे. 

२०२५ पासून काँग्रेसचा सर्व डेटा डिजिटल असेल. याशिवाय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्यांच्या संख्येतही सुमारे ४५० सदस्यांची वाढ करण्यात येणार आहे. एकूण नामनिर्देशित सदस्यांची संख्या १५ टक्क्यांवरून २५ टक्के करण्यात आली आहे. ट्रान्सजेंडरसाठीही पक्षाने दरवाजे खुले केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारने सर्व संस्था काबीज केल्या असून, विरोधकांचा आवाज दाबून ते द्वेषाची आग भडकवीत आहेत. अल्पसंख्याक, दलित, आदिवासी आणि महिलांना भाजप लक्ष्य करीत आहे. भारत जोडो यात्रेने आपल्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला ही बाब आनंददायी होती. १९९८ मध्ये प्रथमच पक्षाचे अध्यक्ष बनणे हे माझे भाग्य होते. या २५ वर्षांत पक्षाने खूप मोठे यश आणि निराशाही पाहिली. सर्वांच्या सहकार्याने आम्हाला बळ मिळाले.     
    - सोनिया गांधी, ज्येष्ठ नेत्या 

लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी आणि एक ठोस पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी समविचारी पक्षांशी आघाडी करण्यास काँग्रेस इच्छुक आहे. द्वेषाचे वातावरण, महागाई, बेरोजगारी आणि राष्ट्रीय सुरक्षा यांची स्थिती गंभीर आहे. लोकशाही मोडीत काढण्याचे षडयंत्र रचले जात आहे. भारत जोडो यात्रेचा प्रकाश देशभर पसरला आहे. राहुल गांधी यांनी अशक्य ते शक्य करून दाखवले आहे. 
    - मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस

प्रियांका गांधी यांच्या स्वागतासाठी 
२ किमी रस्त्यावर फुलांचा गालिचा 

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या महाअधिवेशनात सहभागी होण्यासाठी छत्तीसगडच्या रायपूरमध्ये दाखल झाल्या. त्यांच्या स्वागतासाठी विमानतळाच्या समोरच्या रस्त्यावर फुलांच्या पाकळ्यांचे गालिचे तयार करण्यात आले होते. जवळपास २ किमी रस्ता सजविण्यासाठी ६ हजार किलोपेक्षा अधिक गुलाबाच्या फुलांचा वापर करण्यात आला.  

Web Title: 50% reservation in Congress; Half of the posts in the executive are for SCs, STs, OBCs, minorities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.