नवी दिल्ली - पंतप्रधान कार्यालयाकडून नरेंद्र मोदींच्या संपत्तीची संपूर्ण माहिती जारी करण्यात आली आहे. त्यानुसार नरेंद्र मोदींकडे जवळपास फक्त 50 हजार रुपये रोकड आहे. विशेष म्हणजे गतवर्षी मोदींकडे 1.50 लाख रुपये रोकड होती. मात्र, आता मोदींकडे केवळ 48 हजार 944 रुपयांची रोख रक्कम आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची एकूण संपत्ती 2.28 कोटी रुपये आहे. त्यामध्ये जवळपास 1 कोटी 28 लाख रुपये स्थावर आणि गांधी नगरमध्ये काही जंगम मालमत्ता आहे. पंतप्रधान मोदींनी 2002 मध्ये एक लाख रुपयांच्या किमतीत 3531.45 स्क्वेअर फुटाची संपत्ती खरेदी केली होती. गुजरातच्या गांधीनगर येथील एसबीआय बँकेच्या शाखेत मोदींचे खाते आहे. त्यामध्ये 11,29,690 रुपये जमा आहेत. तसेच पंतप्रधान मोदींनी 1 कोटीपेक्षा अधिक रुपये फिक्स डिपॉजीट केले आहेत.
मोदींनी आणखी काही ठिकाणीही बचत केली आहे. ज्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड डिपॉजीट 20 हजार रुपये आहे. मात्र, ही आकडेवारी 25 जानेवारी 2012 पर्यंतची आहे. त्यासह मोदींनी नॅशनल सेव्हींग सर्टिफिकेटमध्ये 5,18,235 रुपये जमा केले आहेत. तर 1,59,281 रुपये एलआयसीमध्ये जमा आहेत. दरम्यान, मोदींजवळ सोन्याच्या 4 अंगठ्या आहेत. ज्याची किंमत 1 लाख 38 हजार रुपये आहे. विशेष म्हणजे मोदींनी बँकेकडून 1 रुपयाचेही कर्ज घेतले नाही.