जयपूर, दि. ६ - राजस्थानातील सरकारी गोशाळेत तब्बल 500 गायींचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. विश्व हिंदू परिषदेबरोबरच काँग्रेसने याबाबत आवाज उठविल्यानंतर राज्य सरकार जागे झाले असून, एका मंत्र्याने शनिवारी गोशाळेला भेट देऊन पाहणी केली.
जयपूरजवळील हिंगोनिया येथील गोशाळेत हा प्रकार घडला. काँग्रेसने काल हा प्रकार उघडकीस आणला. या गोशाळेत 100 गायींचा मृत्यू झाल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. त्यानंतर विश्व हिंदू परिषदेने या प्रकरणात उडी घेतली. हिंगोनिया गोशाळेत 100 नव्हे, तर 500 गायींचा मृत्यू झाला असून, निष्काळजीपणामुळे गायी मेल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) केला. काँग्रेसनेही असाच आरोप केला आहे. गोशाळेतील अस्वच्छतेमुळे गायी आजारी पडून मरत आहेत. आजारी गायींच्या सुटकेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही विहिंपने केली. टोंक रोडवर असलेली ही गोशाळा जयपूर महानगरपालिकेच्या वतीने चालविण्यात येते. ही आशिया खंडातील सर्वोत्तम गोशाळा असल्याचे मानले जाते.
राजस्थानचे नगरविकासमंत्री राजपाल सिंग शेखावत यांनी शनिवारी गोशाळेची पाहणी केली. महानगरपालिकेचे अधिकारीही त्यांच्यासोबत होते. गोशाळेत साचलेला चिखल आणि शेणाची घाण तात्काळ काढण्याच्या सूचना त्यांनी तेथील व्यवस्थापनास केल्या. पाहणी अहवाल आपण मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना देऊ, असे शेखावत यांनी सांगितले. तत्पूर्वी काल विधिमंडळ कामकाज मंत्री राजेंद्र राठोड यांनी हिंगोनिया गोशाळेला भेट देऊन गायींच्या मृत्यूमागील कारणांची माहिती घेतली होती.
मृत्यू पावलेल्या गायी आजारी होत्या. अस्वच्छतेमुळे एकही गाय मेलेली नाही, असा दावा राज्य सरकारने केला आहे. गोशाळेतील डॉक्टरांनी सांगितले की, गेल्या दहा दिवसांपासून दररोज सुमारे 50 गायी मरत आहेत. बहुतांश गायी उपासमारीने मेल्या असाव्यात असे दिसते. गोशाळेतील प्रमुख पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. हरेंद्र सिंग यांनी सांगितले की, गोशाळेत दररोज 35 ते 38 गायी मरतात. यातील बहुतांश गायी भटक्या आणि आजारी असतात. अनेक गायींना अपघात झालेला असतो. आजारी गायी चारा खात नाही.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट, माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, विरोधी पक्षनेते रामेश्वर डुडी, विश्व हिंदु परिष आणि बजरंग दलाच्या नेत्यांनी वसुंधरा राजे सरकारवर टीका केली आहे.