ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. १५ - अवैधरित्या खाणकाम केल्याप्रकरणी तरुंगवास भोगलेले भाजपाचे माजी मंत्री जर्नादन रेड्डी यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्याची सध्या चर्चा आहे. उद्या १६ नोव्हेंबर रोजी विवाहसोहळा संपन्न होणार आहे. या लग्नसोहळ्यासाठी तब्बल ५०० कोटी रुपये खर्च केल्याची चर्चा आहे. रेड्डींची मुलगी ब्राम्हीणी हिचा आंध्रप्रदेशमधल्या एका उद्योगपतीशी विवाह होत आहे. बॉलीवूडमधले अनेक बडे कलाकार या लग्न सोहळ्यात उपस्थित राहण्याची देखील चर्चा आहे.
या विवाहसोहळ्याला ३० हजारांहून अधिक व-हाडी मंडळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या सगळ्यांची आलिशान हॉटेलमध्ये सोय करण्यात आली आहे. यासाठी शहरातल्या आलिशान हॉटेलमध्ये जवळपास १५०० खोल्या आरक्षित केल्या आहेत. इतकेच नाही तर काही व्हीआयपी पाहुण्यासाठी १५ हॅलीपॅडही उभारण्यात आले आहे. तसेच विवाह सोहळ्यासाठी खास राजा कृष्णदेवराय यांच्या महलाची, हम्पी मधल्या विजय विठ्ठल मंदिराची प्रतिकृती देखील उभारली आहे.
लग्नसोहळ्याच्या सगळ्या विधी या ठिकाणी पार पाडणार आहे. या भव्य दिव्य विवाहसोहळ्यासाठी हत्ती, घोडे, उंट देखील आणण्यात आले आहे आणि सगळ्यांसाठी त्यांनी जवळपास ५०० कोटी रुपये खर्च केल्याचा दावा येथल्या स्थानिक वृत्तवाहिन्यांनी केला आहे. १००० आणि ५०० च्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयामुळे एकीकडे देशात पैशांची चणचण भासू लागली आहे. देशातील नागरिक बँक सुरु व्हायच्या आधीच बँकेबाहेर तासन् तास रांगेत उभे आहेत, असे असताना रेड्डी कुटुंबियाला मात्र याची अजिबात झळ पोहचली नाही.