हरियाणातील सिरसा इथं चौधरी देवी लाल यूनिवर्सिटीच्या जवळपास ५०० युवतींचा एका प्रोफेसरनं लैंगिक छळ केल्याचा आरोप झाला आहे. याबाबत मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, राज्यपाल आणि महिला आयोगाला पत्र लिहिण्यात आले आहे. ज्यात प्रोफेसरनं त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावून युवतींसोबत अश्लिल कृत्य करत असल्याचं म्हटलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रोफेसर हे कृत्य करत असल्याचं पत्रात लिहिलंय. या पत्रानंतर राज्यात खळबळ उडाली असून तातडीनं या घटनेच्या तपासासाठी SIT नेमण्यात आली आहे.
पीडित मुलींनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. जे वाचून अनेकांचा संताप अनावर होईल. त्यात आरोपीविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी नेटिझन्सने केली आहे. रिपोर्टनुसार चौथ्यांदा असं पत्र मुलींनी प्रोफेसरविरोधात लिहिले आहे. त्यात यूनिवर्सिटीच्या अंतर्गत समितीने २ वेळा प्रोफेसरला क्लिनचीट दिली आहे. एएसपी दीप्ती गर्ग यांनी म्हटलं की, सुरुवातीच्या तपासानंतर आम्ही यात गुन्हा दाखल करू. पत्रात जे काही आरोप लावलेत त्याची आधी खातरजमा केली जाईल. तपासात काही निष्पन्न झाल्यास त्यानुसार पुढील कारवाई करू असं त्यांनी सांगितले.
प्रोफेसरनं आरोप फेटाळलाया प्रकरणात ज्यांच्यावर आरोप झालेत त्या प्रोफेसरने सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांनी दावा केलाय की, हे सर्व राजकीय दबावतंत्राचा भाग आहे. मी विद्यापीठाच्या कामात कायम सक्रीय असतो त्यामुळे मला टार्गेट केले जात आहे. माझ्याविरोधातील कुठल्याही तपासाला मी तयार आहे. हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. या प्रकरणी मुलींनी पहिले पत्र मागील वर्षी जून महिन्यात लिहिले होते. ते कुलगुरूंकडे पाठवले. या आरोपांची विद्यापीठात अंतर्गत समितीने चौकशी केली त्यात कुठलेही पुरावे सापडले नाहीत.
त्यानंतर मागील वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्येही राज्यपालांना २ पत्रे पाठवण्यात आली. राज्यपालांनी विद्यापीठाला पुन्हा तपासणीचे आदेश दिले. मात्र तेव्हाही प्रोफेसरला क्लीनचीट मिळाली होती. आता मागील आठवड्यात पुन्हा युवतींनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून प्रोफेसरवर आरोप केलेत. प्रोफेसर त्यांच्या कार्यालयातील बाथरुममध्ये एकटे घेऊन जातात आणि तिथे अश्लिल कृत्य करतात. आम्ही या प्रकाराचा विरोध केला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देतात असा आरोप पत्रात केला आहे. त्याचसोबत प्रोफेसर त्यांच्या कार्यालयातील सीसीटीव्हीसह सर्व पुरावे नष्ट करतात. आम्हाला विद्यापीठावर भरवसा नाही त्यामुळे आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी युवतींनी पत्रात केली आहे.