लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आर्थिक गर्तेत गेल्यामुळे २ मे पासून बंद पडलेल्या गो-फर्स्ट कंपनीत आता कर्मचाऱ्यांची गळती लागली असून कंपनीच्या ताफ्यातील ६०० पैकी ५०० वैमानिकांनीराजीनामा दिल्याची माहिती आहे. हे ५०० कर्मचारी अन्य विमान कंपन्यांमध्ये रुजू होणार आहेत. मे महिन्यापासून पगार न मिळाल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली आहे.
केवळ वैमानिकच नव्हे तर अन्य विभागातील कर्मचाऱ्यांनी देखील राजीनामाअस्त्र उगारल्यामुळे लवकरच पुन्हा विमान उड्डाण करण्याच्या कंपनीच्या प्रयत्नांना खीळ बसणार आहे. उपलब्ध माहितीनुसार, नोकरी सोडण्यामध्ये वैमानिक, केबिन कर्मचारी, विमानाची देखभाल करणारे इंजिनीयर आदी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जुलैपूर्वी कंपनीच्या ताफ्यामध्ये एकूण ४२०० कर्मचारी होते. यापैकी १२०० कर्मचाऱ्यांनी जुलै महिन्यात नोकरी सोडली. त्यानंतर आता ५०० वैमानिक नोकरी सोडणार असून, यामुळे कंपनीच्या ताफ्यात अत्यंत कमी कर्मचारी उरतील. १० मे रोजी कंपनीच्या दिवाळखोरीचा अर्ज मंजूर झाल्यानंतर कंपनीवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे.
सेवा सुरू होण्याबद्दल प्रश्नचिन्ह
- प्रशासकाने कंपनीच्या पुनर्रज्जीवनासाठी नागरी विमान महासंचालनालयाकडे योजना सादर केली होती. त्याला अटी व शर्तींसह मंजुरी मिळाली होती.
- कंपनीच्या ताफ्यातील १५ विमानांच्या माध्यमातून ११४ फेऱ्या कंपनी करणार आहे. परंतु, आता कर्मचारी गळती लागल्यामुळे कंपनीची सेवा सुरू होण्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.