नवी दिल्ली- सर्व व्यवहार एका बटनावर आणण्याचे प्रयत्न असल्यानं मोबाईल, बँक खाती आधारशी जोडण्याचा मोदी सरकारचा मानस आहे. आधारच्या या सक्तीला अनेकांनी विरोध करत सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केल्या आहेत. परंतु याच आधारच्या माध्यमातून 500 बेपत्ता मुलांचा शोध लागल्याची माहिती समोर आली आहे. यूआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडे यांनी हे सार्वजनिक केलं आहे. ग्लोबल कॉन्फरन्स ऑन सायबरस्पेसच्या कार्यक्रमात ते बोलत होते.काही बेपत्ता झालेली मुलं अनाथाश्रमात होती. मात्र ज्यावेळी ती मुलं आधार नोंदणीसाठी गेली, त्यावेळी त्यांचा 12 अंकी बायोमेट्रिक क्रमांक आधीच अस्तित्वात असल्याचं समोर आलं. त्यामुळे या मुलांच्या कुटुंबीयांचा थांगपत्ता लावणं सहज शक्य झालं, अशी माहिती पांडे यांनी दिली आहे. हरवलेली मुलं अनेक वर्षांनी त्यांच्या कुटुंबीयांना आधारमुळेच भेटल्याचं भूषण पांडे यांनी सांगितलं आहे.भारतातल्या लोकसंख्येपैकी ४० टक्के लोकसंख्या 18 वर्षांखालील मुलांची आहे. लहानग्यांसाठी कार्यरत असलेल्या क्राय संस्थेने दिलेल्या माहितीनुसार देशात हरवलेल्या आणि बेपत्ता असणाऱ्या मुलांचे प्रमाण 2013-15 या दोन वर्षांच्या काळात 84 टक्के वाढले होते. सरकारच्या अधिकृत माहितीनुसार, दर दिवशी सरासरी 180 मुलं बेपत्ता होतात. विविध सरकारी योजनांना आधार जोडणी केल्यामुळे यंत्रणांमधून बनावट नावे काढली गेली असून, त्यामुळे आतापर्यंत १० अब्ज डॉलरची बचत झाली आहे, अशी माहितीही पांडे यांनी दिली. देशात 99 टक्के तरुणांकडे आधार कार्ड असल्याचा दावाही त्यांनी केला.
500 बेपत्ता मुलांना मिळाला जगण्याचा 'आधार'!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2017 10:20 AM