ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 24 - नव्या चलनात असलेली कमतरता भरुन काढण्यासाठी नाशिकच्या प्रेसमध्ये 500 च्या नोटांची तिप्पट वेगाने छपाई सुरु आहे. 'आम्ही 500 च्या नोटांची छपाई करण्याचा वेग वाढवला आहे. जिथे नोव्हेंबर महिन्यात 35 लाख नोट छापल्या जात होत्या, तिथे रोज एक कोटी नोटा छापल्या जात आहेत', अशी माहिती प्रेसमधून मिळाली आहे. प्रेसमध्ये रोज एक कोटी 90 लाख नोटा छापल्या जात आहेत, यामधील एक कोटी फक्त 500 च्या नोटा आहेत असंही सुत्रांकडून कळलं आहे. या प्रेसमध्ये 2000 च्या नोटा छापल्या जात नाहीत.
नोटाबंदीनंतर शुक्रवारी नाशिक प्रेसमधून सर्वात जास्त चलन पाठवण्यात आलं. आरबीआयला तब्बल 4 कोटी 30 लाख दशलक्ष नोटा पाठवण्यात आल्या. यामधील एक कोटी 10 लाख रुपयांमध्ये 500 च्या नोटांचा समावेश होता, तर 100 च्या एक कोटी 20 लाख नोटा होत्या. यामध्ये 20 आणि 50 च्यादेखील एक-एक कोटीच्या नोटा होत्या. नोटाबंदीनंतर 11 नोव्हेंबर रोजी नाशिक प्रेसमधून रिझर्व्ह बँकेला फक्त 50 लाख नोटा पाठवण्यात आल्या होत्या.
गुरुवारी एकाच दिवसात पाचशेच्या तब्बल साडे सतरा दशलक्ष नोटा छापून बेलापूरला रवाना करण्यात आल्या. सलग 5 रविवार सुट्टी न घेता छपाई सुरु असल्याची माहिती आहे. पाचशेसोबतच शंभर रुपयांच्या अडीच दशलक्ष नोटाही गुरुवारच्या एका दिवसात छापण्यात आल्या.
गेल्या 43 दिवसांमध्ये नाशिक प्रेसने रिझर्व्ह बँकेला 850 दशलक्ष नोटा पाठवल्या आहेत. ज्यामधील 500 च्या 250 दशलक्ष नोटा होत्या. गेल्या तीन दिवसांमध्ये प्रेसमध्ये 8 कोटी 30 लाख नोटा छापण्यात आल्या असून यामधील 3 कोटी 75 लाख 500 च्या नोटा आहेत.
31 जानेवारीपर्यंत प्रेसमध्ये एकूण 800 दशलक्ष नोटा छापल्या जातील असा अंदाज आहे. यामधील अर्ध्या नोटा तर 500 च्या असतील. देशभरात नोटांची छपाई करणा-या एकूण चार प्रेस आहेत. कर्नाटकमधील म्हैसूर, बंगालमधील सलोबनी येथील प्रेस रिझर्व्ह बँकेच्या आहेत. तर उर्वरित दोन नाशिक आणि देवास येथे असून त्या सेक्युरिटी प्रिटिंग अॅण्ड मीटिंह कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या आहेत.
नोटाबंदीनंतर प्रेसमध्ये रविवारची सुट्टीदेखील रद्द करण्यात आली असून लंच आणि डिनरचा ब्रेकही दिला जात नाही आहे. कर्मचा-यांचे कामाचे तासही वाढवण्यात आले असून रोज 11 तास काम करावं लागत आहे.