भुवनेश्वर (ओदिशा) : महानदीमध्ये बुडालेले ५०० वर्षांपूर्वीचे मंदिर सापडले आहे, असे नदीच्या खोऱ्यात असलेल्या वारसा स्थळांच्या दस्तावेज प्रकल्पावर काम करीत असलेल्या तज्ज्ञांनी सांगितले. सापडलेले मंदिर ६० फूट उंच असून ते ५०० वर्षांपूर्वीचे असावे. या प्रकल्पाचे काम सुरू असताना हे मंदिर दिसले, असे ओदिशातील इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेजचे (इन्टॅक) प्रकल्प समन्वयक अनिल धिर यांनी सांगितले. हे मंदिर कटकमध्ये पद्मावती भागात बैदेश्वरजवळ नदीच्या मधोधम सापडले, असे धिर रविवारी म्हणाले.मंदिराच्या मस्तकाच्या बांधकामाची पद्धत व वापरलेले साहित्य विचारात घेतल्यास ते हे मंदिर १५ किंवा १६ व्या शतकाच्या सुरुवातीच्या वर्षांतील असावे, असे ते म्हणाले. हे मंदिर दुसºया ठिकाणी नेणे आणि त्याच्या जीर्णोद्धारासाठी इन्टॅक आॅर्कालॉजिकल सर्व्हे आॅफ इंडियाशी संपर्क साधेल. आम्ही लवकरच एएसआयला हे मंदिर योग्य ठिकाणी हलवण्यासाठी पावले उचलण्याची विनंती करू. यासाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान त्यांच्याकडे आहे. राज्य सरकारनेही हा विषय एसएसआयकडे मांडावा, असे धिर यांनी म्हटले. इन्टॅकने प्रकल्पात आतापर्यंत महानदीत ६५ पुरातन मंदिरांना शोधले. हिराकूड जलाशयात त्यातील अनेक मंदिरे असून त्यांना तेथून हटवून दुसरीकडे त्यांची उभारणी केली जाऊ शकते. इन्टॅकचे प्रकल्प सहायक दीपक कुमार नायक म्हणाले की, वारसा स्थळांबद्दल प्रेम असलेले स्थानिक रहिवासी रवींद्र राणा यांनी हे मंदिर शोधले. त्यांना ते मंदिर असल्याची कल्पना होती. हे मंदिर गोपीनाथ देवाचे आहे. हा विभाग सुरुवातीच्या दिवसांत सातापाताना नावाने ओळखला जायचा. तथापि, नदीने तिचा मार्ग भयंकर पुरांमुळे बदलल्यानंतर संपूर्ण खेडेच त्यात बुडून गेल्याचे नायक म्हणाले.समृद्ध खोºयाचा अभ्यास योग्यरीत्या झाला नाहीधिर यांनी यापूर्वी जुना जगन्नाथ सडक आणि प्राची खोºयाच्या दस्तावेज प्रकल्पांवर काम केलेले आहे. ते म्हणाले, महानदी खोरे समृद्ध असून त्यात विविधताही खूप असली तरी आजपर्यंत तिचा योग्यरीत्या अभ्यास झालेला नाही. अनेक पुरातन ठिकाणे ही नष्ट झालेली आहेत किंवा नष्ट होण्याच्या काठावर आहेत. हिराकूड धरणामध्ये जवळपास ५० पुरातन मंदिरे गमवावी लागली असल्याचे ते म्हणाले.
महानदीत बुडालेलं ५०० वर्षांपूर्वीचं ६० फुटी मंदिर सापडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 2:53 AM