नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भारतीय जनता पार्टीकडून दलित मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. आज नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर भाजपातर्फे 'भीम महासंगम विजय संकल्प 2019' रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. यादरम्यान,पाच हजार किलो 'समरसता खिचडी' तयार करुन त्याचे कार्यकर्त्यांमध्ये वाटप केले जाणार आहे.
या खिचडीसाठी भाजपा कार्यकर्त्यांनी दिल्लीतील सर्व 14 जिल्ह्यांतील दलित घरांतून जाऊन तांदुळ, डाळ, मीठ आणि अन्य साहित्य जमवले आहे. या साहित्यातूनच समरसता खिचडी तयार केली जाणार आहे. रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक नागरिकाला या खिचडीचा आस्वाद घेता येणार आहे.
या रॅलीमध्ये दिल्लीतील भाजपा अध्यक्ष मनोज तिवारी, थावर चंद गहलोत, रामलाल, श्याम जाजू यांच्यासहीत कित्येक वरिष्ठ नेते सहभागी होणार आहेत. दरम्यान, खिचडीसाठी तांदुळ आणि डाळ जमा करताना भाजपा अनुसूचित जनजाति मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी 14 लाख पत्रकांचं वाटप करुन मोदी सरकारच्या योजनांचा प्रसार आणि प्रचार केला.
(दलित मतांसाठी भाजपाची खेळी; अमित शहांच्या रॅलीमध्ये शिजणार खिचडी)
नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवातून धडा घेत भाजपानं आगामी निवडणुकांसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दलित समाजासोबत संबंध अधिक घट्ट करण्यासाठी आणि विश्वविक्रम रचण्यासाठी भाजपाकडून जवळपास 5,000 किलोग्रॅम खिचडी तयार करण्यात येत आहे.
(शहा यांनी महाराष्ट्रातील खासदारांना दिला निवडणूक जिंकण्याचा मंत्र)
नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर ही समरसता खिचडी तयार करत आहेत. मनोहर आपल्या टीमसोबत 20 फूट व्यासाचे आणि सहा फूट खोल पात्रामध्ये खिचडी तयार करुन विश्वविक्रम रचणार आहेत.
यापूर्वी ऑक्टोबर 2018मध्ये विष्णू मनोहर यांनी वेगवेगळे जिन्नस वापरून 3000 किलोची खिचडी एकाच भांड्यात तयार केली होती. सलग 53 तास नॉनस्टॉप कुकींगचा विश्वविक्रम करणारे शेफ विष्णू मनोहर यांनी घराघरात आणि गरीबांच्या ताटातील खिचडीला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचा प्रयत्न याद्वारे केला. जागतिक खाद्य दिनाच्या निमित्ताने त्यांनी नागपुरातील चिटणीस पार्कमध्ये 3000 किलोची खिचडी तयार केली. ही खिचडी तयार करण्यासाठी त्यांनी कोल्हापुरातून खास प्रकारची कढई मागवली होती. ही खिचडी तयार करण्यासाठी त्यांनी 11 फुटांचा सराटा वापरला. लाकडाच्या इंधनाचा वापर करून त्यांनी स्वादिष्ट खिचडी तयार केली.