नवी दिल्ली : देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. सत्ताधारी आप विरोधात सारे पक्ष एकवटले आहेत. काँग्रेसमध्ये उत्साह दिसत नसला तरीही भाजपाने दिल्ली काबीज करण्यासाठी कंबर कसली आहे. तरीही काँग्रेसला महाराष्ट्रासारखे निकाल लागण्याची आशा आहे.
काँग्रेसने आज दिल्लीमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये सत्तेत आल्यानंतर महिन्याला 300 युनिट वीज मोफत देण्यात येणार आहे. तसेच स्वस्तामध्ये जेवण उपलब्ध करण्यासाठी 100 इंदिरा कॅन्टीन सुरू करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय काँग्रेस लाडली योजना पुन्हा सुरू करणार आहे. विद्यार्थ्यांना नर्सरी ते पीएचडीपर्यंत मोफत शिक्षण देण्याचे वचन दिले आहे. महिला सुरक्षा, शिक्षण, वीज आणि पाण्याचा पुरवठा, रोजगार आणि दलित आदिवासींच्या कल्याणासाठी 20 मुद्दे मांडण्यात आले आहेत.
लहान मुलांना खेळण्यासाठी 1 रुपयांत मैदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या जाहीरनाम्यातील महत्वाची घोषणा म्हणजे बेरोजगारांना भत्ता देण्यात येणार आहे. पदवीधारकांसाठी 5 हजार रुपये तर पदव्युत्तरांसाठी 7500 रुपये बेरोजगारी भत्ता देण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे.