नवी दिल्ली – तेलंगणात कांग्रेस विधानसभा निवडणुका लढण्याची तयारी करत आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यात यावर्ष अखेरीस निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी काँग्रेस नेतृत्वाने कर्नाटकच्या धर्तीवर प्लॅनिंग करण्याची योजना आखली आहे. तेलंगणात एससी, एसटी, दिव्यांग कॅटेगिरीतील इच्छुक उमेदवारांना २५ हजार आणि इतरांना ५० हजार शुल्क आकारण्यात येणार आहे.
कर्नाटक निवडणुकीत सामान्य श्रेणीतील इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज आणि अन्य कागदपत्रांसह २ लाख रुपये शुल्क पक्षाने आकारले होते. तर एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांना १ लाख रुपये शुल्क होते. काँग्रेस पॅनेल सदस्य आणि तेलंगणा प्रदेश कार्याध्यक्ष महेश कुमार गौड म्हणाले की, काँग्रेसनं निवडणुकीत योग्य उमेदवार निवडीसाठी माजी उपमुख्यमंत्री दामोदर राजा नरसिम्हा यांच्या अध्यक्षतेखाली ३ सदस्यीय उपसमिती बनवली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी एक अर्ज तयार करण्यात आला आहे. २५ ऑगस्टपूर्वी ५० हजार किंवा २५ हजार डीडीसह हा अर्ज जमा करायचा आहे. उपसमितीने अर्जाची रक्कम २५ हजार ठेवावी अशी शिफारस केली होती परंतु पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाने शुल्क म्हणून ५० हजार रुपये घ्यावे अशा सूचना केल्या असं त्यांनी सांगितले.
सोशल मीडिया माहिती भरावी लागेल
इच्छुक उमेदवारांना त्यांच्या सोशल मीडिया खात्याची माहिती द्यावी लागणार आहे. जेणेकरून उमेदवारांची पार्श्वभूमी तपासून घेता येईल. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यात प्रदेश कार्यकारणीची बैठक होईल. त्यात सर्व इच्छुक उमेदवारांच्या अर्जाची पडताळणी होईल. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या शिफारशीनुसार उमेदवारी दिली जाईल. मागील २ विधानसभा निवडणुकीत २०१४ आणि २०१८ यात कुठलेही शुल्क आकारले नाही. परंतु २००९ च्या निवडणुकीत पक्षाने १० हजार रुपये शुल्क घेतले होते.
केंद्रीय निवडणूक समिती घेणार निर्णय
उमेदवारी अर्जासोबत ज्यांनी शुल्क दिले आहे त्यातील मजबूत दावेदार पुढे येतील. सर्व इच्छुक उमेदवारांचे अर्ज पडताळणीसाठी पाठवले जातील. प्रत्यक्ष मतदारसंघात स्थिती आणि उमेदवाराची ताकद तपासली जाईल. यानंतर छाननी प्रक्रियेत जे अर्ज निवडले जातील त्याची शिफारस केंद्रीय निवडणूक कमिटीकडे केली जाईल. उमेदवारांची यादी ठरवण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक समितीचा आहे. आम्ही केवळ शिफारस आणि सल्ला देऊ शकतो. अंतिम निर्णय आणि यादी जाहीर दिल्लीतून होईल. उमेदवार एकाहून अधिक मतदारसंघासाठी इच्छुक असेल तर तसे अर्ज भरू शकतो असंही राज्याचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांनी म्हटलं आहे.