मुंबई, दि.26- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केंद्र सरकार 2015 साली अर्थसंकल्पामध्ये अटल पेन्शन योजना सुरु करत असल्याचे जाहीर केले. या योजनेसाठी 2 मे 2017 पर्यंत 51.33 लाख लोकांनी नोंदणी केल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे स्थित माहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी विचारलेल्या माहितीला पेन्शन आणि पेन्शनर्स वेल्फेअर विभागाने दिलेल्या उत्तरात ही आरडेवारी स्पष्ट झाली आहे.
प्रफुल्ल सारडा यांनी अटल पेन्शन योजनेच्या अंतर्गत किती खाती उघडण्यात आली, त्यामध्ये किती पैसे जमा झाले आणि त्यामध्ये सरकारचे योगदान काय असे तीन प्रश्न विचारले होते. त्याला मिळालेल्या उत्तरामध्ये 51. 33 लाख लोकांनी खाती सुरु केल्याचे आणि त्यामध्ये 1883.93 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच 2015-16 या वर्षासाठी केंद्र सरकारने 105.46 कोटींचे योगदान दिल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.
स्वच्छ भारत योजनेसाठी 7856 कोटींची तरतूद
अटल पेन्शन योजनेप्रमाणेच स्वच्छ भारत योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेमध्ये येताच जाहीर केलेली योजना आहे. गंगा नदी शुद्धीकरण आणि सार्वजनिक स्वच्छता या दोन विषयांवर त्यांनी विशेष लक्ष देणार असल्याचे जाहीर केले. प्रफुल्ल सारडा यांनी पंतपर्धान कार्यालयाला विचारलेल्या दुसऱ्या एका माहिती अर्जामधून स्वच्छ भारत योजनेसाठी 2016-17 वर्षासाठी 7856 कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती मिळाली आहे, 2015-16 या वर्षासाठी 6392.95 कोटी रुपयांची तरतूद या योजनेसाठी केली गेली होती व प्रत्यक्षात त्यापेक्षा कितीतरी अधिक म्हणजे 9370 कोटी रुपये खर्च केले गेले तर त्याआधीच्या वर्षी 2730 कोटी रुपयांची स्वच्छ भारतसाठी तरतूद केली गेली होती व 3094 कोटी रुपये प्रत्यक्षात खर्च करण्यात आले होते. ही आकडेवारी पाहता 2020 पर्यंत 'स्वच्छ भारत'चे स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने भारत पावले टाकत आहे अशा शब्दांमध्ये प्रफुल्ल सारडा यांनी समाधान व्यक्त केले आहे. अटल पेन्शन योजनेमध्ये मोठ्या संख्येने लोक गुंतवणूक करत आहेत, आगामी काळामध्ये गुंतवणुकदारांची संख्या वाढेल अशी अपेक्षा सारडा यांनी व्यक्त केली आहे.