गुवाहाटी - महाविकास आघाडी सरकारविरोधात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्याने सध्या राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. दरम्यान, या आमदारांनी सुरुवातीला सूरत आणि नंतर थेट गुवाहाटीमध्ये मुक्काम हलवल्याने गेल्या आठवडाभरापासून गुवाहाटी महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत आलेली आहे. दरम्यान, याच काळात आसाममध्ये पूरस्थिती ओढवल्याने गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये गेलेले आमदार टीकेचे लक्ष्य झाले होते. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या बंडखोर आमदारांनी आसाममधील पूरग्रस्तांन ५१ लाखांची मदत केली आहे. त्यानंतर आसामच्या मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे आणि अन्य आमदारांचे आभार मानले आहेत.
आसाममध्ये आठवडाभर मुक्काम करणाऱ्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या इतर बंडखोर आमदारांनी आसाममधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५१ लाख रुपयांची मदत आसामच्या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देण्याची घोषणा केली होती. ही मदत मिळाल्यानंतर आसामच्या मुख्यमंत्र्यांनी मराठीतून सर्वांचे आभार मानले आहेत. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा मराठीतून केलेल्या ट्विटमध्ये म्हणाले की, मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब आणि शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांचे धन्यवाद. आपण आसामच्या महापुरात नुकसान झालेल्यांच्या मदतीसाठी ५१ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री मदत निधीला केली. आम्ही आपले खुप आभारी आहोत.
दरम्यान, महाराष्ट्राच्या विधानसभेत उद्या बहुमत चाचणी होणार आहे. त्यासाठी गेल्या आठवडाभरापासून आसाममध्ये वास्तव्यास असलेले हे सर्व आमदार उद्या महाराष्ट्रात येणार आहेत. त्याआधी हे सर्व आमदार गोव्यात येतील. तिथून ते महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे.