नवी दिल्ली - नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. शपथविधी पार पडल्यानंतर लगेचच शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खात्यांचे वाटप केले. मोदींच्या कॅबिनेटमधील 56 मंत्र्यांपैकी 51 मंत्री हे करोडपती आहे. तर 22 जणांवर गुन्हे दाखल असल्याची माहिती आता समोर आली आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने याबाबत माहिती दिली आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांची सून आणि अकाली दल प्रमुख सुखबीर सिंह बादल यांच्या पत्नी हरसिमरत कौर बादल या सर्वात श्रीमंत मंत्री आहेत.
हरसिमरत कौर बादल यांच्याकडे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांची एकूण संपत्ती 217 कोटी रुपये आहे. हरसिमरत कौर यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या खात्यात 41 लाख रुपये जमा आहेत. तसेच 60 लाख रुपयांचे बाँड, डिबेंचर आणि विविध कंपन्यांचे शेअर्स आहेत. याशिवाय 25 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जही त्यांच्या नावावर आहे.
हरसिमरत कौर बादल यांना दागिन्यांची प्रचंड आवड आहे. विविध ठिकाणी त्यांच्या नावावर 49 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर 18 कोटी रुपयांची व्यावसायिक संपत्ती आहे. हरसिमरत कौर या फॅशन डिझायनरही आहेत. दिल्लीतील लॉरेंटो कॉन्वेंट स्कूलमधून त्यांनी दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि ड्रेस डिजायनिंगमध्ये पुढील शिक्षण घेतलं. हरसिमरत कौर या पंजाबमधील बठिंडा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. पंतप्रधान मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळातही त्यांच्याकडे अन्न व प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचीच जबाबदारी होती.
नमोपर्व 2.0 : मोदींच्या कॅबिनेटमधील 91 टक्के मंत्री करोडपती
देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली आणि 'नमोपर्व 2.0' ची सुरुवात झाली. मंत्रिमंडळाचा गुरुवारी शपथविधी पार पडल्यानंतर लगेचच शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खात्यांचे वाटप केले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा देशाचे नवे गृहमंत्री झाले आहेत. तर नितीन गडकरी यांना रस्ते आणि वाहतूक मंत्रीपदच देण्यात आले आहे. एडीआर या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा आणि राज्यसभा यातील सदस्यांचा यामध्ये समावेश आहे. प्रत्येक मंत्र्यांकडे जवळपास 14.72 कोटींची संपत्ती आहे. तर गृहमंत्री अमित शहा, रेल्वे मंत्री पीयूष गोयल आणि अकाली दलाच्या हरसिमरत कौरबादल यांच्यासह चार मंत्र्याकडे 40 कोटींपेक्षा अधिक संपत्ती आहे.
56 मंत्र्यापैकी 22 मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत. त्यातील 16 जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने दिली आहे. तर आठ मंत्र्यांनी दहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेतलं असून 47 मंत्री हे पदवीधर आहेत. शपथविधी समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत 24 कॅबिनेट, नऊ राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार) आणि 24 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली.