राजस्थानमध्ये सध्या मद्यविक्रीच्या दुकांनांचा लिलाव सुरू आहे. यामध्ये अमुमानगढ जिल्ह्यातील कुईंयां गावातील एका मद्यविक्रीच्या दुकानासाठी बोली प्रक्रिया सुरू होती. या मद्य विक्रीच्या दुकानाची बोली ही ७२ लाखांपासून सुरू झाली पण ती थांबण्याचं नावच घेत नव्हती. या मद्यविक्रीच्या दुकानावर आपलाच ताबा असावा यासाठी एकाच कुटुंबातील दोन महिलांमध्ये सुरू झालेल्या चढाओढीमुळे सकाळी ११ वाजता सुरू झालेली ही लिलावाची प्रक्रिया रात्री २ वाजता संपली. कुटुंबातील एका महिलेनं ७२ लाखांचं दुकान चक्क ५१० कोटी रूपयांना विकत घेतलं. गेल्या वर्षी कुईंयां गावातील मद्यविक्रीच्या दुकानाची ६५ लाख रूपयांना विक्री करण्यात आली होती. यावर्षी या दुकानासाठी बोली प्रक्रिया ७२ लाखांपासून सुरू करण्यात आले. परंतु या दुकानाच्या खरेदीवरुन एकाच कुटुंबातील दोन महिलांमध्ये तू तू मी मी करत सामना रंगला. यानंतर सकाळी ११ वाजता सुरू झालेला हा सामना रात्री २ वाजता ५१० कोटी रूपयांवर संपला. इतकी मोठी बोली लागल्यामुळे आता उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीही आश्चर्यचकित झाले आहेत. ५१० कोटींची बोलीउत्पादन शुक्ल विभागाच्या अधिकाऱ्यांनी रात्री २ वाजता ही बोली प्रक्रिया संपल्यानंतर पुढील कार्यवाहीला सुरूवात केली आहे. ५१० कोटी रूपयांची बोली लावणाऱ्या या महिलेचं नाव किरण कंवर असं असून त्यांना आता दोन दिवसांच्या आत ही रक्कम जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. दरम्यान, उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना यावर अद्यापही विश्वास होत नाहीये. परंतु या लिलावाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांना त्यांना अलॉटमेंट लेटर जारी केलं आहे. तसंच जर विजेत्यानं आता दुकान विकत घेतलं नाही तर पुढील वेळेपासून त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात येणार असल्याचंही विभागानं स्पष्ट केलं आहे. गहलोत सरकारनं सुरू केली लिलाव प्रक्रियाराजस्थानमध्ये अशाप्रकारे या प्रक्रियेद्वारे विक्री करण्यात येत असल्याचा लोकांकडूनही विरोध करण्यात आला आहे. ज्या दुकानांची पाच ते दहा लाखांत विक्री होत होती त्यांची यावेळी पाच ते दहा कोटी रूपयांत विक्री झाली आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी बेरोजगारांना संधी देण्यासाठी आणि मद्याची अवैधरित्या विक्री थांबवणअयासाठी बोली प्रक्रिया बंद केली होती. तसंच या ठिकाणी लॉटरी सिस्टम सुरू करण्यात आली होती. परंतु मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी १५ वर्ष जुनी व्यवस्था संपवून पुन्हा लिलाव प्रक्रिया सुरू केली. यातून सरकारला हजारो कोटी रूपयांचा महसूलही मिळाला आहे.
दोन महिलांमध्ये रंगला सामना; तू-तू मी-मी मध्ये ७२ लाखांच्या मद्यविक्रीच्या दुकानासाठी लावली ५१० कोटींची बोली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2021 1:59 PM
एकाच कुटुंबातील दोन महिलांमध्य रंगला होता सामना
ठळक मुद्देगहलोत सरकारनं सुरू केली लिलाव प्रक्रियाएकाच कुटुंबातील दोन महिलांमध्य रंगला होता सामना