छत्तीसगडमधील नवा रायपूर येथे काँग्रेसच्या ८५व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सोनिया गांधी (Congress Sonia Gandhi) यांनी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केलं होतं. यादरम्यान, त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले. मात्र, सोनिया गांधी यांनी राजकारणातून निवृत्त होणार असल्याचं वृत्त फेटाळून लावलं आहे. तर, काँग्रेसच्या याच कार्यक्रमान खासदार राहुल गांधी यांनी भूतकाळातील, बालपणीच्या भावूक आठवणींचा किस्सा सांगितला. तसेच, आज ५२ वर्षे झाली, मला राहायला घर नाही, असेही राहुल गांधींनी म्हटले. अलाहाबाद येथे जे घर आहे, तेही आमचे नाही, असेही त्यांनी म्हटले.
राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात भाषण करताना उपस्थित पदाधिकाऱ्यांसमोर भावूक किस्सा सांगितला. मी वयाच्या ६ वर्षांचा होतो, तेव्हा आम्हाला राहता बंगला सोडून जायचं होतं. सन १९७७ ची गोष्ट आहे, निवडणूक आली होती, मला काहीही कळत नव्हतं. घरी वेगळंच वातावरण होतं. मी आईकडे गेलो आणि आईला विचारलं काय झालंय. तेव्हा आईने सांगितलं, आपण हे घर सोडतोय. तोपर्यत ते घर आमचंच आहे, असं मला वाटायचं. पण, आईने सांगितलं, राहुल हे आपलं घर नाही, हे सरकारी घर आहे. मग, मी प्रश्न केला आई कुठे जायचंय, तर आई म्हटली, माहिती नाही. मला काहीच समजेना. कारण, ते घर मी आमचंच समजत होतो. ५२ वर्षे झाली माझ्याकडे घर नाही, आजपर्यंत माझ्याकडे घर नाही, असा भावनिक किस्सा राहुल गांधींनी या अधिवेशनात सांगितला. मी १२ तुलघक रोडवर राहतो, पण माझ्यासाठी ते घर नाही.
मी काश्मीर ते कन्याकुमार पायी प्रवास केला होता. भारत जोडो यात्रेत मला घर मिळालं. गेल्या ४ महिन्यात रस्त्यावर भेटणाऱ्या प्रत्येक भारतीयांसोबत माझं घर होतं. दरम्यान, राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेतील अनेक आठवणही यावेळी कथित केल्या.
मी कधीच निवृत्त होणार नाही
"मी कधीच निवृत्त झाली नव्हती आणि कधीच होणार नाही" असं काँग्रेस नेत्या सोनिया गांधींनी म्हटलं आहे. काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी ही माहिती दिली आहे. या मुद्द्यावर सोनिया गांधींशी चर्चा झाल्याचं अलका लांबा यांनी म्हटलं आहे. अलका यांनी "मी मॅडमना निवृत्तीशी संबंधित बातम्या मीडियामध्ये आल्याबद्दल सांगितलं, तेव्हा त्या हसल्या आणि म्हणाल्या की, मी कधीच निवृत्त झाली नाही आणि भविष्यातही होणार नाही" असं म्हटलं आहे.
"१९९८ साली मी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली ही माझ्यासाठी सन्मानाची बाब होती. २५ वर्षात पक्षाने अनेक मोठे यश संपादन केले आहे आणि निराशाही आली आहे. २००४ आणि २००९ मध्ये आमच्या विजयाबरोबरच मनमोहन सिंग यांच्या सक्षम नेतृत्वामुळे मला वैयक्तिक समाधान मिळाले, पण मला याचा सर्वाधिक आनंद आहे. अध्यक्ष म्हणून कार्यकाळात 'भारत जोडो यात्रे'ने संपुष्टात आली. यामुळे काँग्रेस आणि जनता यांच्यातील संवादाचा वारसा समृद्ध झाल्याचे" सोनिया गांधी म्हणाल्या.