चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथील एका सात वर्षाच्या मुलाच्या तोंडातून तब्बल 526 दात शस्त्रक्रिया करुन काढले आहेत. विशेष म्हणजे, दात जबड्याच्या हाडाशी जोडलेले असल्यामुळे दिसून येत नव्हते. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केल्यानंतर 526 हात काढले असून आता या मुलाच्या तोंडात 21 दात राहिले आहेत. तसेच, शस्त्रक्रियेनंतर आता मुलाला काहीही त्रास होत नाही.
रवींद्रनाथ असे या मुलाचे नाव आहे. त्याचे गाल सुजल्याने दात किडला असेल म्हणून त्याच्या कुटुंबीयांनी त्याला डॉक्टरकडे दाखविले. त्यावेळी त्याच्या जबड्याखाली 526 दात असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. त्यामुळे डॉक्टरांनी सर्जरी करून त्याचे 21 दात वगळता सर्व 526 दात बाहेर काढले. बुधवारी प्रसारमाध्यमांसमोर रवींद्रनाथ याने आपल्या गालाला हात लावून सांगितले की, 'आता दात किंवा चबड्यात दुखत नाही. पण, थोडीशी सूज आहे ती हळू-हळू कमी होईल.'
रवींद्रनाथ तीन वर्षाचा होता. तेव्हापासून त्याच्या गळ्याला सूज आल्याचे दिसून येत होते. याबाबत रवींद्रनाथचे वडील प्रभुदौस यांनी सांगितले की, 'रवींद्रनाथ याला सरकारी रुग्णालयात दाखवल्यानंतर त्याची तपासणी केली. त्यावेळी डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगितले. मात्र, तो लहान असल्यामुळे आम्ही त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला होता. त्यानंतर दातदुखी वाढत गेल्याने अखेर त्याला सविता डेंटल कॉलेजात आणून विविध टेस्ट करण्यात आल्या. त्याचा एक्स रे आणि सीटीस्कॅनही करण्यात आला. त्यांनतर 11 जुलै रोजी सर्जरी करून त्याचे दात काढण्यात आले.'
दरम्यान, याआधी 2014 मध्ये मुंबईत एका मुलाच्या तोंडातून 232 दात काढण्यात आले होते. आशिष गवई असे त्या मुलाचे नाव असून तो मुळचा बुलडाण्याचा रहिवाशी असल्याचे समजते. मुंबईतील जे. जे. रुग्णालयात त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.