ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ - संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेतून आज ५३ खासदार निवृत्त होत आहेत. राज्यसभेतून निवृत्त होणा-या खासदारांचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसणार आहे. काँग्रेसचे ६५ खासदार असून, त्यातील १६ सदस्य निवृत्त होत आहेत. काँग्रेसच्या निवृत्त होणा-या सदस्यांमधून फारच कमी खासदार पुन्हा राज्यसभेवर येण्याची शक्यता आहे.
भाजपचे केंद्रात मंत्री असलेले व्यंकय्या नायडू, पियुष गोएल, निर्मला सितारामन, मुख्तार अब्बास नक्वी आणि वायएस चौधरी निवृत्त होत असून, त्यांची पुन्हा राज्यसभेवर निवड होईल. भाजपची राज्यसभेतील सदस्य संख्या वाढणार असली तरी, त्यांना पूर्ण बहुमत मिळवता येणार नाही.
व्यंकय्या नायडू कर्नाटकातून राज्यसभेवर जाऊ शकतात. विजय मल्ल्याच्या राजीनाम्यामुळे तिथे एक जागा रिकामी झाली आहे. किंवा गृहराज्य आंध्रप्रदेशातूनही राज्यसभेवर येऊ शकतात. जयराम रमेश आंध्रप्रदेशातून राज्यसभेवर आले आहेत. पण आता त्यांना कर्नाटकमधून राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते. कारण कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. महाराष्ट्रातून एकमेव जागेसाठी सुशीलकुमार शिंदे, गुरुदास कामत आणि मुकूल वासनिक यांची नावे चर्चेत आहेत.