नवी दिल्ली : हरयाणातील कैथल जिल्ह्यातील एक दानशूर रद्दीवाला सध्या खूप चर्चेत आहे. मोठ-मोठ्या उद्योगपतींना लाजवेल असे कृत्य करणारे ५३ वर्षीय फकीर चंद सर्वांची मनं जिंकत आहेत. खरं तर ते मागील २५ वर्षापासून रद्दी विकण्याचा व्यवसाय करत आहेत. लक्षणीय बाब म्हणजे ते आपल्या कमाईतील जवळपास ९० टक्के रक्कम लोकांना दान करतात.
दरम्यान, फकीर चंद हे एका छोट्या घरात राहतात. त्यांनी सांगितले की, ते ५ भाऊ आणि बहिणी होते. पण आता ते एकटेच हृयात आहेत. चंद यांनी स्वत:ची ११ लाख रुपये आणि भावाच्या आणि बहिणीच्या मृत्यूनंतर वाचवलेली २४ लाखांची रक्कमही दान केली. फकीरचंद जिथे जिथे जातात तिथे त्यांचा पेहराव बघितला तर ते दानशूर गृहस्थ असतील असे कोणालाच वाटणार नाही.
२५ वर्षापासून रद्दी विकण्याचा व्यवसायफकीर चंद यांना भाऊ-बहिणींकडून पुरेसा पैसा मिळाला होता. मात्र, मेहनत अन् जिद्द त्यांना स्वस्त बसून देत नव्हती आणि म्हणूनच त्यांनी निरोगी शरीर ठेवण्यासाठी सतत मेहनत करत राहण्याचे ठरवले. फकीर चंद सांगतात की, गेली २५ वर्षे ते पुठ्ठा गोळा करत आहेत आणि भंगाराच्या दुकानात विकतात. तसेच जे पैसे मिळतात ते गरिबांना दान करतात. फकीरचंद दररोज सुमारे ७०० ते ८०० रुपये कमावतात आणि १५०-२०० रूपयांची बचत करून उर्वरित पैसे दान करतात.
५ गरीब मुलींचं लावलं लग्न फकीर चंद यांनी दान केलेल्या रकमेतून आतापर्यंत ५ गरीब मुलींची लग्ने करण्यात आली आहेत. प्रत्येक मुलीच्या लग्नात सुमारे ७५ हजार रुपयांचे सामानही देण्यात आले. याशिवाय त्यांनी धर्मशाळेत गायींसाठी शेड, गोशाळा, मंदिराच्या धर्मशाळेत शेड बनवण्याच्या कार्यात हातभार लावला. याशिवाय कैथलमधील नीलकंठ मंदिरासाठी १२ ते १३ लाख रुपये दान केले आहेत. वृद्धाश्रमात एक खोली बांधण्यासाठी त्यांनी २ लाख ३० हजाराची मदत केली.
अनेक गोशाळा, मंदिरे, वृद्धाश्रमात केले दानफकीर चंद यांनी सांगितले, "मी भंगार गोळा करण्याचे काम करतो. पुठ्ठा, प्लास्टिक आणि लोखंड विकून दिवसाला ७००-८०० रूपये मिळतात. मी माझ्या उदरनिर्वाहासाठी काही पैसे वाचवतो आणि बाकीचे दान करतो. आत्तापर्यंत मी ३५ लाख रुपये दान केले आहेत. माझी बहिण आणि भाऊ देखील हेच काम करायचे. त्यांनी मृत्यूनंतर २४ लाख रूपये मागे ठेवले. मग मी त्यांचेही पैसे दान केले. मी अनेक गोशाळा आणि मंदिरांसाठी पैसे दिले आहेत. याशिवाय ५ मुलींची लग्ने लावली असून वृद्धाश्रमात एक खोली बांधण्यासाठी मदत केली आहे. या पैशांचा चांगल्या कार्यासाठी उपयोग व्हावा एवढेच मला वाटते. रतन टाटा यांसारखे मोठे लोक दान करतात, मला वाटले की मी देखील दान करावे, दान करण्यासाठी श्रीमंत असण्याची गरज नाही, मन मोठे असले पाहिजे. मला लोकांना एक संदेश द्यायचा आहे की, त्यांच्या गरजेनुसार पैसे ठेवून बाकीचे पैसे दान केले पाहिजेत."