नवी दिल्ली : सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपीसारख्या निमलष्करी दलांमध्ये ५४ हजार जवानांची भरती करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यातील एकट्या सीआरपीएफमध्ये सर्वात जास्त म्हणजे २१,५६६ जवानांची भरती करण्यात येतील.स्टाफ सीलेक्शन कमिशनतर्फे या महाभरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार ४७३०७ पुरुष व ७६४६ महिला जवानांची कॉन्स्टेबल पदासाठी भरती करण्यात येणार आहे. सीआयएसएफ, सशस्त्र सीमा दल, आसाम रायफल्स, राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए), सेक्रेटरिएट सिक्युरिटी फोर्स (एसएसएफ) यांच्यासाठीही ही भरती होणार आहे.सूत्रांनी सांगितले की, निमलष्करी दलांमध्ये नव्या बटालियनची स्थापना करण्यात येणार आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर जवानांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.२० आॅगस्टपर्यंत मुदतया पदांसाठी १८ ते २३ वर्षे वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करावेत, असे सुचविण्यात आले आहे. अर्जदार किमान दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना परीक्षा, शारीरिक क्षमतेची चाचणी, अंतिम फेरीतील वैद्यकीय चाचणी अशा विविध प्रकारच्या चाचण्यांना सामोरे जावे लागणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २० आॅगस्ट आहे.
निमलष्करी दलांमध्ये ५४ हजारांची महाभरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 10:44 PM