रायपूर : छत्तीसगढमधील तुरुंगांतील दुर्गंधी सुटलेल्या, घाणेरड्या पाच हजारांपेक्षा जास्त चादरी प्रथमच धुतल्या जाणार आहेत. त्वचारोगाच्या व त्या चादरींमुळे त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारी झाल्यानंतर त्या चादरी धुण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील २२ हजार कैद्यांची आरोग्य तपासणी नुकतीच करण्यात आल्यानंतर, त्यांच्यापैकी अनेकांना त्वचारोग आणि घाणेरड्या व दुर्गंधी सुटलेल्या चादरींमुळे त्रास होत असल्याचे आढळले. कैदी या चादरी किमान पाच वर्षांपासून वापरत होते. त्यांना बुरशी येऊ नये म्हणून चादरी उन्हात ठेवण्यात आल्या. या चादरी धुण्यासाठी ४० लाख रुपये खर्चून लवकरच यंत्रे मागवण्यास परवानगी दिली गेली आहे व चादरी तुरुंगांतच धुतल्या जातील, असे महासंचालक (तुरुंग) गिरधारी नायक यांनी रविवारी सांगितले. कैद्यांच्या ज्या त्वचारोगाच्या व इतर त्रासाच्या तक्रारी होत्या. त्यांचा संबंध प्रामुख्याने घाणेरड्या चादरींशी असल्याचे चौकशीत आढळल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. नंतर समोर आले ते या चादरी कधी धुतल्याच गेल्या नव्हत्या हे वास्तव. छत्तीसगढमध्ये पाच मध्यवर्ती तुरुंग असून, १२ जिल्हा व १६ उप तुरुंग आहेत. या सगळ््या तुरुंगात १८ हजारांपेक्षा जास्त कैदी आहेत. त्यातील १० हजार जणांवर खटले सुरू असून ८ हजार दोषी ठरलेले आहेत. प्रत्येक कैद्याला दोन ते तीन चादरी दिल्या जातात. एकूण ५४ हजार चादरी राज्यात वापरात आहेत. वॉशिंगमशीनची क्षमता एका वेळी २० किलोची असून एका दिवसात ५०० चादरी धुतल्या जातील. या गतीने सगळ््या चादरी धुण्यासाठी चार महिने लागतील. तुरुंगातील परिस्थिती स्वच्छ भारत अभियानअंतर्गत सुधारण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यातून कैदी चांगले नागरिक बनावेत असा उद्देश आहे. अर्थात त्यासाठी कैद्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले असले पाहिजे, असे नायक म्हणाले.
कैद्यांच्या ५४ हजार चादरी ५ वर्षांनी धुणार
By admin | Published: February 07, 2017 1:59 AM