नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचे देशावरील संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. दिवसागणिक कोरोना बाधितांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. देशातील कोरोना बाधितांची संख्या 5,734 वर पोहोचली आहे. आतापर्यंत एकूण 473 जणांना रुग्णालयातून रेफर आणि डिस्चार्ज दिला असला तरी, गेल्या 24 तासांत 549 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर कालपासून आजपर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. आजवर देशात एकूण 166 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
देशात कोरोना व्हायसरची स्थिती, सुरू असलेल्या उपाय योजना आणि लॉकडाऊनच्या स्थितीसंदर्भात आज (गुरुवार) आरोग्यमंत्रालय आणि गृहमंत्रालयाची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रार परिषदेत आरोग्य मंत्रालायाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे.
49,000 व्हेंटिलेटर्ससाठी देणयात आली ऑर्डर -
अग्रवाल म्हणाले, हरियाणातील करनाल जिल्ह्यात 'अॅडॉप्ट अ फॅमिली’ अभियानांतर्गत 13,000 गरजू कुटुंबांना 64 लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. पीपीई, मास्क आणि व्हेंटिलेटर्स यायला सुरुवात झाली आहे. भारतातील 20 उद्योजकांना पीपीई तयार करायला सांगितले आहे. 1.7 कोटी पीपीईसाठी ऑर्डर देण्यात आली असून पुरवठाही सुरू झाला आहे. तसेच एकूण 49,000 व्हेंटिलेटर्ससाठीही ऑर्डर देण्यात आली आहे, असे लव अग्रवाल म्हणाले.
रेल्वेचे 2,500 हून अधिक डॉक्टर्स आणि 35,000 पॅरामेडिकल कर्मचारी तैनात -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने 2,500 हून अधिक डॉक्टर्स आणि 35,000 पॅरामेडिकल कर्मचारी तैनात केले आहेत. त्यांचे 586 हेल्थ युनिट्स, 45 उप-विभागीय रुग्णालये, 56 विभागीय रुग्णालये, 8 उत्पादन युनिट रुग्णालये आणि 16 झोनल रुग्णालयांनी कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी त्यांचा महत्वपूर्ण सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच रेल्वेने 80,000 आयसोलेशन बेड तयार करण्यासाठी 5,000 कोचसला आयसोलेशन यूनिटमध्ये परिवर्तित करत आहेत. यापैकी 3,250 तयारही करण्यात आले आहेत.