ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 01 - बांगलादेश दहशतवादी हल्ल्यानंतर वादात अडकलेले इस्लामिक धर्मगरु डॉ. झाकीर नाईकच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. झाकीर नाईकवर कारवाई करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या तपासात 55 दहशतवादी झाकीर नाईकपासून प्रेरित झाल्याची माहिती समोर आली आहे. देशभरातून गेल्या 10 वर्षात अटक करण्यात आलेल्या या दहशतवाद्यांची सुरक्षा यंत्रणांनी यादी तयार केली आहे. या 55 दहशतवाद्यांनी आपण झाकीर नाईकपासून प्रेरित झाल्याची कबुलीही दिली आहे.
झाकीर नाईकवर कायदेशी कारवाई करता येऊ शकते का, याची चाचपणी करण्यासाठी केंद्रीय गृहंत्रालयाने सुरक्षा यंत्रणांना तपास करण्यास सांगितलं होतं. राष्ट्रीय तपास यंत्रणाने (एनआयए) 2005 पासून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची चौकशी केली. हे सर्व दहशतवादी सिमी, लश्कर-ए-तोयबा, इंडियन मुजाहिद्दीन आणि इसिस या संघटनांसाठी काम करताना पकडले गेले होते. यात 3 पोलिसांचाही समावेश आहे.
सुरक्षा यंत्रणा झाकीर नाईकविरोधात देशभरात दाखल असलेल्या गुन्ह्यांचीही माहिती घेत आहेत. झाकीर नाईकवर एकूण चार फौजदारी गुन्हे दाखल असून कोल्हापूरमध्ये एक खटला प्रलंबित आहे.