कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाल्याची पहिली घटना समोर आली आहे. येथे कोरोना व्हायरसची लागण झालेल्या एका व्यक्तीचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी सांगितले. या घटनेबरोबरच देशातील मृतांचा आकडा आता 9वर जाऊन पोहोचला आहे.
संबंधित व्यक्ती आणि त्याचे कुटुंब इटलीहून भारतात आले होते. कोलकात्याच्या डमडम भागात राहणाऱ्या या व्यक्तीचे वय 55 वर्ष होते. या व्यक्तीच्या कुटुंबातील इतर सदस्य दक्षिण कोलकात्यातील एका रुग्णालयात उपचार घेत आहेत.
पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या 7 असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यात येणारी सर्व विमाने रद्द करण्यात यावीत, अशी विनंती केली आहे.
देशात कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा 467 वर - कोरोनाने आता हळूहळू संपूर्ण देशात हात-पाय पसरायला सुरुवात केली आहे. देशात कोरोना बाधितांचा आकडा आता 467वर जाऊन पोहोचला आहे. यापैकी 9 जणांचा मृत्यू झाला आहे. संक्रमण झालेल्यांमध्ये 41 परदेशी नागरिकाचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 97वर -गुजरात, बिहार आणि महाराष्ट्रात रविवारी प्रत्येकी एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. महाराष्ट्रात आता कोरोनाबाधितांची संख्या ९७ वर पोहोचली आहे. नुकतेच सांगलीत ४, मुंबईत ३ आणि साताऱ्यात एक, असे आठ नवे रुग्ण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे. सांगलीत आढळून आलेले चार कोरोनाबाधित सौदी अरेबियावरून आले आहेत.