नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या संसदीय कारकीर्दीला रविवारी ५५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह लोकमत पार्लमेंटेरियन अवाॅर्ड समितीच्या सदस्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. शरद पवार आमदार म्हणून १९६७ मध्ये महाराष्ट्र विधानसभेत निवडून आले होते. तेव्हापासून ते सातत्याने विधानसभा, विधान परिषद, लोकसभा सदस्य राहिले. सध्या ते राज्यसभा सभागृहाचे सदस्य आहेत. या प्रदीर्घ काळात त्यांच्या संसदीय कारकिर्दीत एकाही दिवस खंड पडला नाही.
देशाच्या संसदीय इतिहासात शरद पवार यांचे योगदान मोलाचे व अनुकरणीय असल्याचे विजय दर्डा यावेळी म्हणाले. यावेळी लोकमत पार्लमेंटेरियन अवाॅर्ड समितीचे सदस्य माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, बीजेडीचे ज्येष्ठ खासदार भर्तुहरी मेहताब, आरएसपीचे खासदार एन. के. प्रेमचंद्रन, राज्यसभा सचिवालयाचे माजी महासचिव योगेंद्र नारायण, टीव्ही ९ भारतवर्षचे संपादक हेमंत शर्मा, ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता, लोकमतचे नॅशनल एडिटर हरीश गुप्ता व वरिष्ठ संपादक शरद गुप्ता उपस्थित होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद हे या ठिकाणी लवकर येऊन निघून गेले. त्यांना काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला जायचे होते. तत्पूर्वी, त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली.