जयपूर : वादग्रस्त भू संपादन विधेयकाच्या मुद्यावरून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला चढवला. एक इंचही जमीन सरकारला हिसकावू देणार नाही, असे त्यांनी ठणकावले.सहा महिन्यांत काँग्रेस, देशातील शेतकरी, मजूर त्यांची ५६ इंचाची छाती ५.६ इंचाची बनवून सोडतील, अशी टीका राहुल यांनी केली.राजस्थान दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी जयपूर येथे पक्षकार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते. संसदेत भू संपादन विधेयक कुठल्याही स्थितीत पारित होऊ दिले जाणार नाही. तुम्ही बघा, एक इंचही जमिनीचे संपादन होणार नाही.सहा महिन्यांतच ५६ इंचाची छाती ५.६ इंचाची होईल आणि हे कोण करील, तर काँग्रेस पक्ष, देशाची जनता, शेतकरी, मजूर, अशा शब्दांत राहुल यांनी अप्रत्यक्षपणे मोदींवर हल्ला चढवला. विदेशातील काळा पैसा परत आणून प्रत्येक भारतीयाच्या बँक खात्यात १५-१५ लाख रुपये जमा करण्याच्या आश्वासनावरूनही त्यांनी मोदींवर टीका केली. ललित मोदी कोट्यवधी रुपयांसह विदेशात बसला आहे. त्याला परत आणा आणि राजे सरकार हटवून जनतेचे सरकार आणा, असे ते म्हणाले.
- पंतप्रधानांसोबतच ललित मोदींसोबतच्या संबंधांवरून राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनाही राहुल यांनी लक्ष्य केले. आयपीएलचे माजी प्रमुख लंडनमध्ये बसून रिमोटद्वारे राजस्थान सरकार चालवत असल्याचा आरोप यानिमित्ताने त्यांनी केला. राजे सरकारची तुलना स्वातंत्र्यापूर्वीच्या ब्रिटिश सरकारशी करताना ते म्हणाले की, ब्रिटिश सरकारचे रिमोट लंडनमध्ये होते, तसेच राजे सरकारचे रिमोटही लंडनमध्ये आहे. तेथून बटन दाबले जाते आणि इथे राजे सरकार उड्या मारायला लागते, असे वाक्बाण राहुल यांनी यावेळी सोडले.
(वृत्तसंस्था)