अहमदाबाद , दि.17- 56 वर्षापूर्वी भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांनी शिलान्यास बसवलेल्या सरदार सरोवर धरणाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत केलं आहे. जगातील दुसरे आणि भारतातील सर्वांत मोठे धऱण ठरणार आहे. या लोकार्पणासाठी मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 10.30च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या अनेक वरीष्ठ नेत्यांच्या उपस्थित लोकार्पण करण्यात आलं. यावेळी नितीन गडकरीही उपस्थित होते.
धरणाच्या लोकार्पणासह नरेंद्र मोदी गुजरात निवडणुकीच्या प्रचाराचे बिगुलही फुंकणार आहेत. गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या नर्मदा महोत्सवाची सांगताही आज होईल. लोकार्पणानंतर पंतप्रधान डभोई येथे सभा घेणार आहेत. धरण लोकापर्ण सोहळा अहमदाबादपासून २०० किलोमीटवर आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन १९६१ मध्ये झाले होते. मात्र, दप्तरदिरंगाई, विस्थापितांचा विरोध, न्यायालयीन लढा यामुळे प्रकल्प साठ वर्षे रेंगाळला होता.दरवाजे बंद केल्यावर धरणाची उंची १३८ मी पर्यंत वाढली तसेच या धरणाची जलसाठा क्षमता ४.३ दशलक्ष क्युबिक मिटर्स इतकी झाली. पुर्वी धरणाची उंची १२१.९२ मी. इतकी होती. धरणाबाबत बोलताना गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी म्हणाले,' यामुळे १८ लाख हेक्टर्स जमिन ओलिताखाली येईल तसेच नर्मदेचे पाणी कालव्यांतून ९ हजार गावांमध्ये खेळवले जाईल.
या धरणाचा प्रत्येक दरवाजा ४५० टन वजनाचा असून तो बंद होण्यासाठी एका तासाचा अवधी लागतो. सरदार सरोवर हे त्यामध्ये वापरण्यात आलेल्या सर्वाधिक कॉक्रीटच्या वापरामुळेही चर्चेत आहे. सर्वात जास्त कॉक्रीट या धरणासाठी वापरले गेले आहे. अमेरिकेतील ग्रँड काऊली धरणानंतर सर्वात मोठे धरण म्हणून सरदार सरोवर प्रकल्पाचे नाव घेतले जाणार आहे. या धरणातून तयार झालेल्या विजेपैकी ५७ टक्के वीज महाराष्ट्र, २७ टक्के वीज मध्य प्रदेश तर ६ टक्के वीज गुजरात वापरणार आहे. १.२ किमी लांब या धरणावरील प्रकल्पाने आजवर ४१४१ कोटी युनीटची वीज निर्मिती केली आहे.
या प्रकल्पाची पायाभरणी १९६१ साली झाली होती. अनेक कारणांमुळे त्याला विलंब होत गेला. मेधा पाटकर यांच्या नर्मदा बचाव आंदोलनामुळे १९९६ साली धरणाचे काम थांबवण्याचे आदेश १९९६ साली देण्यात आले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने २००० साली पुन्हा काम सुरु करण्याचे आदेश दिल्यानंतर धरणाचे काम पुन्हा वेगाने सुरु करण्यात आले. भारतातील एक महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण क्षमतेने उद्यापासून काम करण्यास सुरुवात करणार आहे. सर्व काम पूर्ण होण्यास ५६ वर्षे लागण्याते हे विरळ उदाहरण असावे.