केरळात मुसळधार पावसाचे ५७ बळी, दीड लाख नागरिकांचे स्थलांतर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 04:46 AM2019-08-11T04:46:05+5:302019-08-11T04:46:35+5:30
केरळात मुसळधार पावसाचा कहर सुरूच असून, पूर आणि भूस्खलन व पावसाशी संबंधित दुर्घटनांत आतापर्यंत ५७ जणांचा मृत्यू झाला आहे
तिरुवनंतपुरम : केरळात मुसळधार पावसाचा कहर सुरूच असून, पूर आणि भूस्खलन व पावसाशी संबंधित दुर्घटनांत आतापर्यंत ५७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक लाखापेक्षा अधिक लोकांना सुरक्षितपणे शिबिरात स्थलांतरित करण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन दिवसांत कोझीकोड आणि मलप्पुरममध्ये २० लोकांचा, तर वायनाडमध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात ९८८ शिबिरांत १ लाख ६५ हजार ५१९ लोक आहेत. वायनाडमधून सर्वाधिक २४ हजार ९९० लोकांनी या शिबिरात आश्रय घेतला आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, अद्यापही काही लोक मलप्पुरम आणि वायनाड येथे भूस्खलनामुळे ढिगाºयाखाली असल्याची शक्यता आहे. तेथे मदतकार्य सुरू आहे. पाण्याची पातळी वाढल्याने बाणसूर प्रकल्पाचे दरवाजे उघडण्याचे संकेतही त्यांनी दिले.
यूएईचे नागरिकांना आवाहन
दुबई : संयुक्त अरब अमिरातने (यूएई) केरळमध्ये जाऊ इच्छिणाºया आपल्या देशातील नागरिकांना असे आवाहन केले आहे की, पावसाच्या पार्श्वभूमीवर सावधानता बाळगावी. केरळात अनेक भागांत पुरामुळे अनेकांचा मृत्यू झाला. तिरुवनंतपुरममधील वाणिज्य दूतावासाने असे आवाहन केले आहे की, केरळात जाणाºया यूएईच्या नागरिकांनी दूतावासात नोंदणी करावी. जेणेकरून, त्यांच्यावर लक्ष ठेवले जाईल.
कर्नाटकातीलपूरस्थिती आणखी गंभीर; ६ हजार कोटींचे नुकसान
बंगळुरू : कर्नाटकात मुसळधार पाऊस सुरूच असल्याने शनिवारी पूरस्थिती आणखी गंभीर बनली आहे. तथापि, नागरिकांनी काळजी करू नये, सरकार सर्वतोपरी मदत करील, असे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी म्हटले आहे. येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मदत आणि पुनर्वसन ही आमची प्राथमिकता आहे. राज्यात आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली आहे. अर्थमंत्रालयाने मदतीसाठी तात्काळ १०० कोटी रुपये जारी केले आहेत.
सूत्रांनी सांगितले की, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पूरग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत. बेळगावशिवाय बागलकोट, विजयपुरा, रायचूर, यादगीर, गडग, उत्तर कन्नड, हावेरी, हुबळी-धारवाड, दक्षिण कन्नड, चिकमंगळूर आणि कोडागू या जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला आहे. सक्लेशपूरमध्ये मरानाहल्लीजवळ भूस्खलन झाले आहे. कन्नड जिल्ह्यात नेत्रवती नदीला आलेल्या पुरामुळे मंगळुरू गाव जलमय झाले आहे. ज्या भागात अधिक पूर आहे तिथे चार हेलिकॉप्टरने मदतकार्य सुरू आहे. ६ तासांत तीन नौकांमधून २७० जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
कर्नाटकात २६ जणांचा मृत्यू : मुसळधार पावसानंतर आलेल्या पुराने ६००० कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, ४५ वर्षांतील हा सर्वात मोठा पूर आहे. आम्ही केंद्र सरकारकडे ३००० कोटी रुपयांची मागणी केली आहे. काही गावांची तर पूर्णपणे नव्याने उभारणी करण्याची गरज आहे. आतापर्यंत पावसाशी संबंधित घटनांत २४ जणांचा मृत्यू झाला आहे.