गुवाहाटी/बंगळुरू/थिरुवनंतपुरम : मान्सूनच्या आगमनापूर्वीच देशातील काही राज्यांमध्ये वादळ आणि अतिवृष्टीने हाहाकार माजविला आहे. आसाम, बिहार आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये पूर आणि वीज काेसळल्यामुळे आतापर्यंत ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातच हवामान खात्याने पुढील दाेन दिवस या राज्यांसह देशातील अनेक ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज वर्तविल्याने चिंतेत भर पडली आहे.
अनेक भागांमध्ये पूर्वमाेसमी हालचाली सुरू झाल्या आहेत. ईशान्येकडील आसाम आणि मेघालयमध्ये पूरस्थिती सर्वात गंभीर आहे. ब्रह्मपुत्रा आणि इतर नद्यांना भीषण पूर आला असून शेकडाे गावे पाण्यात बुडाली आहेत. आसाममध्ये आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर मेघालयमध्ये हा आकडा १४ वर पाेहाेचला आहे. सुमारे ७ लाखांहून अधिक लाेक पूर आणि अतिवृष्टीमुळे प्रभावित झाले आहेत. एकट्या नागाव जिल्ह्यात सुमारे साडेतीन लाख नागरिक प्रभावित झाले आहेत. आसामच्या जमुनामुख जिल्ह्यातील दाेन गावांमध्ये राहणाऱ्या ५०० हून अधिक लाेकांना चक्क रेल्वे रुळांवर तात्पुरता आश्रय घेण्याची वेळ आली.
केरळमध्ये धरणांचे दरवाजे उघडले
केरळमध्ये मुसळधार पावसामुळे इडुक्की जिल्ह्यातील कल्लारकुट्टी आणि पंबला या धरणांचे दरवाजे उघडले आहेत. हवामान खात्याने राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये २२ मेपर्यंत ‘यलाे अलर्ट’ जारी केला आहे.
बिहारमध्ये ३३ जणांचा मृत्यू
बिहारमध्ये वादळी पाऊस आणि वीज पडल्यामुळे १६ जिल्ह्यांमधील ३३ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी भागलपूर येथे सर्वाधिक ७ जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या नातेवाइकांना ४ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. बिहारमध्ये दाेन दिवस वादळी पावसाची शक्यता आहे.
कर्नाटकमध्ये जनजीवन विस्कळीत
कर्नाटकमध्ये बंगळुरूसह दक्षिणेकडील भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात पुरामुळे ९ जणांचा मृत्यू झाला असून खबरदारी म्हणून राज्यातील सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी घरे आणि वाहनांचे माेठे नुकसान झाले आहे. संततधार पावसामुळे किनारपट्टीजवळील जिल्ह्यांमध्ये भूस्खलनाचा धाेका वाढला आहे.