कोर्इंबतूर : तामिळनाडूत निवडणूक अधिकाऱ्यांना शनिवारी तिरुपूर जिल्ह्यात तपासणीमध्ये तीन कंटेनर्समधून तब्बल ५७0 कोटी रुपयांचे घबाड हाती लागल्याने देशभर खळबळ माजली. त्यावर लगेच कोणीच दावा न केल्यामुळे निवडणुकीच्या निमित्ताने हा पैसा मतदारांना वाटला जाणार होता की काय, अशी शंका व्यक्त केली गेली. मात्र ती रक्कम आमची असल्याचा दावा रात्री स्टेट बँकेने केला आणि मग निवडणूक आयोगापासून सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. यापूर्वी तीनदा मिळून राज्यातून निवडणूक अधिकाऱ्यांनी सुमारे १00 कोटी रुपये जप्त केले होते. मात्र आज एवढी मोठी रक्कम सापडल्याने संशय निर्माण झाला होता. तामिळनाडूतील प्रचार आज संपण्याआधी ती सापडल्याने शंकेत वाढच झाली होती. पहाटे तीन कंटेनरमधून निघालेली ही रक्कम जप्त करण्यात आली. तिरुपूरमधून तीन कंटेनर वेगाने जाताना पाहून निवडणूक अधिकाऱ्यांना शंका आली. कंटेनर व त्यापुढे पुढे असलेल्या दोन कार थांबवण्याचा प्रयत्नही असफल ठरला. त्यामुळे पाठलाग करून वाहने अडवली. वाहने का थांबवली नाही, असे त्यातील विचारले असता, दरोड्याच्या भीतीने आम्ही निघून न थांबता गेलो, असे त्यातील लोकांनी पोलीस व निवडणूक अधिकाऱ्यांना सांगितले. ही रक्कम बँकांतर्गत हस्तांतरणाची असल्याचा दावा वाहनांतील लोकांनी केला होता. कोर्इंबतूरमधील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेतून ५७० कोटी रुपये विशाखापट्टणम येथील बँकेच्या शाखेत हस्तांतरित करण्यात येणार होते, हे नंतर उघडच झाले.आवश्यक दस्तावेज नसल्याने स्टेट बँकेच्या कोर्इंबतूर व विशाखापट्टणम येथील अधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी खातरजमा करण्यास बोलावून घेतल्यावर खुलासा झाला. त्यांनी प्राप्ती कर विभागालाही या प्रकाराची माहिती दिली. आंध्र प्रदेशात रोख नोटांचा तुटवडा असल्यामुळे रिझर्व्ह बँकेने आम्हाला रक्कम पाठविण्यास सांगितली होती, त्यानुसार ही रक्कम पाठविली असल्याचे स्टेट बँकेतर्फे सांगण्यात आले.ही रक्कम बँकेची असेल, तर कंटेनरवर सील का नव्हते, कर्मचाऱ्यांकडे व्यवहाराची मूळ कागदपत्रे का नव्हती, असा प्रश्न निवडणूक अधिकाऱ्यांना पडला होता. मात्र कंटेनरच्या पुढील दोन वाहनांमध्ये आंध्रचे पोलीस होते, असा दावा बँकेने केला.आमच्या अधिकाऱ्यांनी मूळ कागदपत्रे निवडणूक आयोगाला दाखवली आहेत, असे स्टेट बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक रमेश बाबू यांनी सांगितले. बँकेतर्फे ही रात्री तसा अधिकृत खुलासा करण्यात आल्याने वादावर पडदा पडला.
५७० कोटी रुपये स्टेट बँकेचेच!
By admin | Published: May 15, 2016 5:39 AM