भुवनेश्वर - 'शिक्षणाला वय नसते' हे विधान ओडिशातील एका आमदार महोदयांनी सिद्ध केले आहे, या आमदाराचे नाव अंगद कान्हार असे आहे. ओडिशाच्या माध्यमिक शिक्षण मंडळाने (BSE) बुधवारी इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल जाहीर केला. यामध्ये दहावीत उत्तीर्ण झालेले BJD चे आमदार यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आणि त्यांनी विद्यार्थ्यांसह आनंद साजरा केला.
शिक्षणाला वयाची मर्यादा नसते
दरम्यान, आमदार कान्हार हे पेशाने एक शेतकरी आहेत, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच ते सत्ताधारी बीजेडीच्या तिकिटावर फुलबनीचे आमदार म्हणून निवडून आले. याआधी ते जिल्ह्यातील फिरिंगिया गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. बुधवारी दहावीचा निकाल जाहीर होताच कान्हार प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यानंतर त्यांनी देवी-देवतांचा आशिर्वाद घेतला आणि गावातील मंदिरात जाऊन पूजा केली.
आनंद व्यक्त करताना कान्हार यांनी म्हटले, "मला आनंद आहे की दहावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झालो आहे. शिक्षण घेण्यासाठी किंवा कोणतीही नवीन गोष्ट शिकण्यासाठी वयाची मर्यादा नसते. शिक्षण भविष्यातील फक्त चांगल्या नोकरीसाठीच नाहीतर ज्ञान मिळवण्यासाठी देखील खूप महत्त्वाचे आहे."
मुलींनी मारली बाजी
ओडिशाच्या माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या निकालात मुलींचे वर्चस्व पाहायला मिळाले, यामध्ये ९०.५५ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्याचे घोषित करण्यात आले. तर ८८.७७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ओडिशाचे शिक्षण मंत्री एस.आर दास यांनी म्हटले की, ८,९२५ शाळांमधील एकूण ५,२६,८१८ विद्यार्थी हायस्कूल प्रमाणपत्र (HSC) परीक्षेत बसले होते. यावेळी ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली.