नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजधानी दिल्लीतील भारत मंडपम येथे ७ व्या भारतीय मोबाईल काँग्रेस २०२३ चे उद्घाटन केले. यावेळी, देशातील १०० शिक्षणसंस्थांसाठी ५ जी युजकॅस लॅब देण्याची घोषणा केली. भारतीय मोबाईल काँग्रेस हा आशियातील सर्वात मोठा दूरसंचार, मीडिया आणि औद्योगिक विकास मंच आहे. दिल्लीतील प्रगती मैदानजवळी भारत मंडपम सभागृहात २७ ते २९ ऑक्टोबर या तीन दिवसांसाठी याचे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी बोलताना मोदींनी म्हटले की, आपण जेव्हा भविष्यावर बोलत असतो, तेव्हा पुढील दशक किंवा शताब्दीबद्दल भाष्य करतो. मात्र, टेक्नॉलॉजी विकासाच्या माध्यमातून आता ह्या गोष्टी काही दिवसांतच पूर्ण होतात. येणारा काळ निश्चितच वेगळा आहे, देशाची भावी पिढी देशाच्या टेक इंडस्ट्रीचं नेतृत्त्व करत आहे. जगभरातील देशांच्या तुलनेत भारतात ५ जी टेक्नॉलॉजीचा विस्तार गतीने होत आहे. तरीही आपण थांबलो नाहीत. याउलट ६जी च्या क्षेत्रातही जगाचं नेतृत्व करण्याच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू आहे, असे मोदींनी म्हटले.
दूरसंचार आणि औद्योगिक क्षेत्रातील भारताच्या अविश्वसनीय प्रगतीला जगासमोर ठेवण्याचं काम या तीन दिवसांत होत आहे. आयएमसी २०२३ मध्ये जवळपास २२ देशांतील १ लाखांपेक्षा अधिक उद्योग जगतातील मान्यवर सहभाग घेणार आहेत. त्यामध्ये, जवळपास ५००० सीईओ दर्जाचे प्रतिनिधी, २३० सादरकर्ते आणि ४०० स्टार्टअप व इतरही हितधारक सहभागी आहेत.