पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या हस्ते देशात 5G सेवांचा शुभारंभ करण्यात आला. 1 ऑक्टोबरपासून दिल्लीतील प्रगती मैदानावर 4 दिवसीय इंडिया मोबाइल काँग्रेस (India Mobile Congress) कार्यक्रमाला सुरूवात झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5G सेवेची सुरूवात केली. यावेळी त्यांच्यासोबत माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री देवुसिंह चौहान उपस्थित होते.
यावेळी त्यांना तीन टेलिकॉम कंपन्यांनी 5G सेवांचा डेमो दाखवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत यावेळी रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबांनी, एअरटेलचे प्रमुख सुनिल मित्तल, व्होडाफोन आयडियाचे कुमार बिर्ला देखील होते. याशिवाय आकाश अंबानी यांनीदेखील पंतप्रधानांना 5G सेवांची माहिती दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिओ पॅव्हेलियनमध्ये प्रदर्शित ट्रू 5G उपकरणे पाहिली आणि 'Jio-Glass' चा अनुभव घेतला.
आपण देशात 5G सेवा जरी उशिरा सुरू केली असली तरी देशभरात ती लवकर पूर्ण करणारे देश ठरणार आहोत. डिसेंबर २०२३ पर्यंत 5G ची चं जाळ संपूर्ण देशभरात पसवणार असल्याचं आश्वासन देत ही परवडणारी सेवा असेल असं आश्वासन अंबानी यांनी दिले.
आज देशात 5G सेवांचा शुभारंभ करण्यात आला ही देशासाठी अभिमानाची बाब असल्याचं मत अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलं. मुकेश अंबानी यांनीही यावर्षी झालेल्या रिलायन्सच्या एजीएममध्ये दिवाळीपर्यंत Jio 5G सेवा सुरू होणार असल्याचे सांगितले होते. पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत देशभरात त्याचे रोलआउट केले जाईल. पॅन इंडिया 5G नेटवर्कच्या विस्तारासाठी कंपनी 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत असल्याचेही त्यांनी म्हटले होते.