नवी दिल्ली : दूरसंचार क्षेत्रातील बहुप्रतीक्षित ५जी चाचण्यांना भारत सरकारने मंगळवारी परवानगी दिली. चिनी कंपन्यांना मात्र चाचण्यांपासून दूर ठेवण्यात आले आहे. भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने देशात ५जी चाचण्या घेण्यास मंजुरी दिली आहे.परवानगी मिळालेल्या कंपन्या भारतात ५जी तंत्रज्ञान आणि उपकरणांच्या चाचण्या घेतील.
चाचण्यांची परवानगी मिळालेल्या दूरसंचार सेवा दाता कंपन्यांत भारती एअरटेल लि., रिलायन्स जिओइन्फोकॉम लि., व्होडाफोन आयडिया लि. आणि एमटीएनएल यांचा समावेश आहे. या कंपन्यांची मूलभूत ५जी तंत्रज्ञान पुरवठादार व उपकरणे उत्पादक कंपन्यांशी भागीदारी आहे. तंत्रज्ञान पुरवठादार कंपन्यांत एरिक्सन, नोकिया, सॅमसंग आणि सी-डॉट यांचा समावेश आहे. रिलायन्स जिओइन्फोकॉम लि.ने आपले स्वत:चे स्वदेशी ५जी तंत्रज्ञान विकसित केले असून, त्याआधारेच कंपनी चाचण्या घेणार आहे. २०२२ पर्यंत ५जी तंत्रज्ञानाचा जगभर वापर सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. मंजुरी देण्यात आलेल्या यादीत चिनी कंपनीसोबत भागीदारी असलेली एकही भारतीय कंपनी समाविष्ट नाही. सीमेवरील तणावामुळे भारताचे चीनसोबतचे संबंध बिघडले आहेत. या पार्श्वभूमीवर चिनी कंपन्यांना चाचण्यांतून बाहेर ठेवण्यात आले आहे.