नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे भारतासह संपूर्ण जगात चिंतेचे वातावरण आहे. दक्षिण अफ्रिकेसह 12 देशांमध्ये कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. त्यामुळे ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर भारतात केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी कडक नियम लागू केले आहेत. दरम्यान, बुधवारी जोखमीच्या देशांतून 11 फ्लाइट्स भारतात दाखल झाल्या असून त्यामध्ये 6 प्रवाशांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.
देशात लखनौ वगळता विविध आंतरराष्ट्रीय विमानतळांवर 'जोखीम' असलेल्या देशांमधून मध्यरात्रीपासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत एकूण 11 आंतरराष्ट्रीय फ्लाइट्स दाखल झाल्या. या फ्लाइट्समध्ये एकूण 3476 प्रवासी होते. या सर्व प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी केवळ 6 प्रवासी कोरोना बाधित आढळले. या कोरोना बाधित प्रवाशांचे नमुने संपूर्ण जिनोम सिक्वेन्सिंगसाठी INSACOG प्रयोगशाळेत पाठवले आहेत.
'जोखीम' असलेल्या देशांच्या यादीतील देश30 नोव्हेंबरला अपटेड केलेल्या यादीनुसार, 'जोखीम' देशांमध्ये युरोपीय देश, यूके, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बोत्सवाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, सिंगापूर, हाँगकाँग आणि इस्रायल यांचा समावेश आहे. या देशांतील प्रवाशांनी भारतात आल्यावर RT-PCR चाचणीसह अतिरिक्त उपायांचे पालन करणे आवश्यक आहे.
आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेता, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, जी 1 डिसेंबरपासून लागू करण्यात आली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रवाशाने प्रवास सुरू करण्यापूर्वी 14 दिवसांची प्रवासाची माहिती सादर करणे आणि कोरोना व्हायरसची निगेटिव्ह RT-PCR टेस्ट रिपोर्ट एअर सुविधा पोर्टलवर अपलोड करणे आता बंधनकारक आहे.
याचबरोबर, 'जोखीम' श्रेणीत येणाऱ्या देशांतील प्रवाशांना येथे आल्यावर कोरोना टेस्ट करावी लागेल आणि टेस्टचा रिपोर्ट येईपर्यंत विमानतळावर थांबावे लागेल. प्रवाशाची टेस्ट निगेटिव्ह आल्यास त्यांना सात दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल आणि आठव्या दिवशी त्यांची पुन्हा चाचणी केली जाईल. यावेळीही त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास त्याला पुढील सात दिवस स्वत:च्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले जाईल.