ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - देशभरातील शेतकरी आत्महत्या करत असताना त्यांच्या कल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'डीडी किसान' चॅनेलची सुरूवात केली खरी... पण त्याचा फायदा शेतक-यांऐवजी वेगळ्याच व्यक्तीला होताना दिसत आहे. शेतक-यांसाठी सुरू करण्यात आलेल्या या चॅनलच्या जाहिरातीसाठी सरकारने अभिनेता अमिताभ बच्चन यांच्याशी तब्बल ६.३१ कोटींचा करार केल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. 'डीडी किसान' चॅनेलसाठी फक्त ४५ कोटी रुपयांचे बजेट असतानाही तब्ब्ल ६ कोटी एकट्या अमिताभ यांच्यावर खर्च झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान या जाहिरातीसाठी अमिताभ यांच्याआधी अभिनेता अजय देवगण व काजोल यांच्या नावाचा विचार करण्यात आला होता. तसेच सलमान खानशीही या जाहिरातीविषयी चर्चा झाली होती. अखेर सरकराने अमिताभ बच्चन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून ६ कोटींचा करार केला.
दूरदर्शनच्या पॅनेलमध्ये असणा-या 'लिंटास इंडिया प्रा. लि' या एजन्सीतर्फे सरकार व अमिताभ बच्चन यांच्या दरम्यान ३० एप्रिल २०१६ पर्यंत करार करण्यात आला आहे. या करारानुसार अमिताभ टी.व्ही, प्रिंट, इंटरनेट व सिनेमासाठीच्या 'जाहिरातीत' झळकणार आहेत.
शेतक-यांच्या कल्याणासाठी असलेले हे चॅनेल देशातील जनतेने भरलेल्या कराच्या पैशातून उभं राहिलं असताना, फक्त जाहिरातींसाठी एवढी मोठी रक्कम खर्च झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.