काँग्रेसच्या ६ हमींनी BRS चे तीनतेरा; तेलंगणात KCR यांची सत्तेची हॅटट्रिक हुकली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 05:44 AM2023-12-04T05:44:24+5:302023-12-04T05:44:57+5:30

तेलंगणा राज्याच्या स्थापनेचे हिरो असलेले केसीआर यांनी २०१४ आणि २०१८ ची विधानसभा निवडणूक जिंकून पूर्ण बहुमत मिळविले.

6 guarantees of Congress is reason to BRS Defect in telangana ; KCR's hat-trick of power in Telangana is lost | काँग्रेसच्या ६ हमींनी BRS चे तीनतेरा; तेलंगणात KCR यांची सत्तेची हॅटट्रिक हुकली

काँग्रेसच्या ६ हमींनी BRS चे तीनतेरा; तेलंगणात KCR यांची सत्तेची हॅटट्रिक हुकली

चंद्रकांत कित्तुरे

हैदराबाद : उत्तरेतील तीन राज्यांत भाजप विजयाची पताका फडकावत असतानाच तेलंगणात काँग्रेसने मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) तीनतेरा वाजविले. विधानसभेच्या ११९ जागांपैकी निम्म्याहून अधिक जागा जिंकत तेलंगणा राज्याच्या स्थापनेनंतर प्रथमच सत्ता संपादन केली. याचबरोबर सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुका जिंकून विजयाची हॅटट्रिक करण्याचे केसीआर यांचे स्वप्नही धुळीस मिळविले. यामुळे भारत राष्ट्र समितीला देशपातळीवरील पक्ष बनविण्याच्या त्यांच्या महत्त्वाकांक्षेलाही ब्रेक लागणार आहे.

कर्नाटकपाठोपाठ तेलंगणांमधील या यशामुळे काँग्रेसला आगामी निवडणुकांमध्ये दक्षिणेत मोठे बळ मिळणार आहे. काँग्रेसच्या या विजयात राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आणि  तेलंगणाचे पक्ष निरीक्षक माणिकराव ठाकरे यांचाही मोठा वाटा आहे. तेलंगणा राज्याच्या स्थापनेचे हिरो असलेले केसीआर यांनी २०१४ आणि २०१८ ची विधानसभा निवडणूक जिंकून पूर्ण बहुमत मिळविले. त्यांनी दहा वर्षांत राज्याचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला. मात्र  कालेश्वर धरण प्रकल्पावरून झालेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि  प्रस्थापिताविरुद्धचा असंतोष त्यांना भोवला.  भाजपने तेलंगणात आपल्या तीन खासदारांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. तरीही थोडेफार संख्याबळ वाढविण्या-इतपतच या पक्षाला यश मिळाले.

आश्वासनपूर्तीचे काँग्रेसपुढे आव्हान
कर्नाटकप्रमाणेच काँग्रेसने तेलंगणातही निवडणूक जाहीरनाम्यात सहा हमी दिल्या होत्या. घरातील कर्त्या महिलेच्या खात्यावर दरमहा अडीच हजार रुपये, ५०० रुपयांत गॅस सिलिंडर, राज्य परिवहन मंडळाच्या बसेसमधून मोफत प्रवास ही महालक्ष्मी योजना, रयतू भरोसा योजनेअंर्तगत फाळ्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्याला दरवर्षी १५ हजार, शेतमजुराला १२ हजार रुपये आणि भातपिकाला ५०० रुपये बोनस, गृहज्योती योजनेअंतर्गत प्रत्येक घरात २०० युनिट-पर्यंत मोफत वीज, इंदिराअम्मा योजनेअंतर्गत तेलंगणा चळवळीतील सैनिकांना २५० चौरस यार्डचा भूखंड, बेघरांना जागा व प्रत्येकी ५ लाख रुपये, युवा विकासम योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ५ लाखांचे विद्याभरोसा कार्ड, प्रत्येक मंडलामध्ये तेलंगणा इंटरनॅशनल स्कूल, ज्येष्ठांसाठी दरमहा ४ हजार रुपये पेन्शन व १० लाखांपर्यंतचा राजीव आरोग्यश्री विमा या हमींचा समावेश आहे. त्यांची पूर्तता करण्याचे आव्हान काँग्रेससमोर असेल.

रेवंथ रेड्डी विजयाचे शिल्पकार
काँग्रेसला बहुमत मिळवून देणारे प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी हेच विजयाचे शिल्पकार ठरले. मुख्यमंत्रिपदाचे दावेदारही तेच असतील. रेवंथ रेड्डी यांना तेलंगणा राष्ट्र समितीने २०१४ च्या निवडणुकीत विधानसभेचे तिकीट नाकारले होते. यामुळे त्यांनी केसीआर यांची साथ सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

Web Title: 6 guarantees of Congress is reason to BRS Defect in telangana ; KCR's hat-trick of power in Telangana is lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.