धार - मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यात तिरला ठाणे हद्दीतील इंदूर-अहमदाबाद मार्गावर झालेल्या भीषण अपघातात 6 शेतमजुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोमवार-मंगळवारच्या मध्यरात्री 12.30 वाजता ही भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेते जवळपास 23 मजूर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सोयाबीन कापणीच्या कामासाठी केसून येथे गेले होते, आपले काम झाल्यानंतर रहिवाशी ठिकाण असलेल्या टांडा येथे परतत असताना या शेतमजूरांच्या पीकअप गाडीचे चाक पंक्चर झाले. त्यामुळे, ड्रायव्हर आणि काही मजूरांनी गाडीतून बाहेर उतरुन टायर बदलण्याचे काम हाती घेतले होते. यादरम्यान, एका टँकरने पीकअप वाहनाला जोराची धडक दिली. या दुर्घटनेत चार मजूरांचा जागीच मृत्यू झाला तर अनेक मजूर पीकअपमधून उडून बाहेर पडले. या पीकअपमधून महिला व लहान मुलेही प्रवास करत होती.
अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक प्रशासन, गावकरी व रुग्णवाहिकांच्या मदतीने मृतांना व जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. तर, गंभीर जखमींना इंदूरमधील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मात्र, 4 जणांनी रुग्णालयातच आपला जीव सोडला. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये दोन महिला व दोन 10 ते 12 वर्षीय लहान मुलांचा समावेश आहे.
जिल्हा पोलीस प्रशासनाने या अपघाताची माहिती दिली असून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मृतांप्रती शोक व्यक्त केला आहे. तसेच, जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी आपण प्रार्थना करत असल्याचेही म्हटले.