सुरेंद्रनगर : गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यात ट्रक आणि कारच्या धडकेत सात जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मालवण खेरवा जवळील रामापीर मंदिराजवळ हा अपघात झाला.
ट्रकने इको कारला धडक दिल्याने सात जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातावेळी इको कारला आग लागली आणि कारमधील प्रवाशांचा जिवंत जळून मृत्यू झाला. धडकेनंतर कारने इतक्या लवकर पेट घेतला की त्यामधील पुरूष आणि महिलांची संख्या ओळखणे अशक्य होते.
प्राथमिक माहितीनुसार, पाटण जिल्ह्यातील वरही तालुक्यातील कोयदा गावचे एक कुटुंब चोटीला मंदिरात गेले होते. घरी परतत असताना हा अपघात झाला, ज्यामध्ये इको कारमधील सात लोकांचा जिवंत जळून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमध्ये गॅस किट होती, त्यामुळे आग लागण्याची शक्यता आहे. एफएसएल टीम येऊन चौकशी करेल. या लोकांच्या निवासस्थानाची तपासणी वाहनच्या नंबर प्लेटच्या आधारे केली जाईल. तर, या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला, असे सुरेंद्रनगर जिल्ह्याचे पोलीस उपअधिक्षक एचपी दोषी यांनी सांगितले.