बंगळुरू : नाते म्हटले की प्रेमासोबत वाद येतोच. मात्र यातील काही वाद थेट कोर्टापर्यंत जातात आणि घटस्फोट घेत पत्नीला पोटगीही द्यावी लागते. पोटगीची रक्कम मर्यादित असेल तर ठीक अन्यथा तो चर्चेचा विषय ठरतो. असेच एक प्रकरण सध्या व्हायरल होत असून, यात एका पत्नीने पतीकडे थेट महिन्याला सहा लाख रुपयांपेक्षा अधिकची पोटगी मागितली. पोटगीची ही रक्कम ऐकून चक्क न्यायाधीशांनाही धक्का बसला आणि इतकी पोटगी हवी असेल तर स्वत: पैसे कमवा. एकट्या महिलेसाठी इतके पैसे कोण खर्च करते असे महिलेला सुनावले.
यापूर्वी काय झाले होते?राधा मुनुकुंत यांनी गेल्यावर्षी बंगळुरू कौटुंबिक न्यायालयात अपील केले होते. बंगळुरू कौटुंबिक न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी महिलेचे पती एम. नरसिम्हा यांना ५० हजार रुपये मासिक पोटगी देण्याचे आदेश दिले होते. मात्र हा आदेश मान्य नसल्याचे सांगितले अन् महिलेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
नेमकी कशासाठी हवी होती ६ लाखांची पोटगी?हे प्रकरण बंगळुरू उच्च न्यायालयामधील आहे. महिलेचे वकील आपल्या अशिलाला तिच्या पतीकडून ६ लाख रुपये मासिक देखभाल भत्ता मिळावा यासाठी युक्तिवाद करत होते.वकिलाने सांगितले की, महिलेला शूज, कपडे इत्यादींसाठी दरमहा १५ हजार रुपये लागतात, तर जेवणासाठी ६० हजार रुपये लागतात. यासोबतच महिलेच्या वकिलाने सांगितले की, महिलेला पाय आणि गुडघेदुखीचा त्रास होत असून, त्यासाठी फिजिओथेरपी आणि इतर औषधांचा ४-५ लाख रुपये खर्च येतो.
कोर्ट म्हणाले...न्यायालयाने महिलेला फटकारले आणि म्हटले की, दरमहा ६,१६,३०० रुपयांची मागणी करणे अत्यंत सामान्य आहे, हे तुम्ही न्यायालयाला सांगू नका. एकट्या महिलेसाठी इतका पैसा कोण खर्च करते? या महिलेवर कुटुंबाची कोणतीही जबाबदारी नसल्याचे सुनावले. मुलांची काळजीही तुम्हाला घ्यायची नाही, तुम्ही संवेदनशील असायला हवे. महिलेने योग्य रकमेची मागणी केली नाही तर तिची याचिकाही फेटाळली जाईल, असेही न्यायाधीशांनी सुनावले.