कानपूर-
कानपूरच्या आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणाचं एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. येथील एका नर्सिंग होममध्ये लावण्यात आलेल्या आय कॅम्पमध्ये मोतिबिंदूची शस्त्रक्रिया केलेल्या ६ रुग्णांची शस्त्रक्रियेनंतर दृष्टीच गेली आहे. रुग्णांच्या डोळ्यात अशाप्रकारचं इन्फेक्शन झालं की त्यांना आता दिसेनासं झालं आहे. या घटनेनंतर बरेच दिवस रुग्णालयात खेटे घालूनही काही होत नसल्यानं अखेर त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे याची तक्रार दाखल केली आहे.
मुख्यमंत्री कार्यालयानं तातडीनं यात लक्ष घालून चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या परवानगीच्या आधारावरच शहरात हे कॅम्प डीबीसीएस योजनेअंतर्गत सुरू करण्यात आले होते. समोर आलेल्या माहितीनुसार शिवराजपूरमधील रहिवासी असलेल्या या रुग्णांनी २ नोव्हेंबर रोजी कानपूरच्या आराध्या नर्सिंग होममध्ये विनाशुल्क आय कॅम्पमध्ये मोतिबिंदूची शस्त्रक्रिया केली होती. डॉ. नीगर गुप्ता यांनी या रुग्णांवर शस्त्रक्रिया केली होती. शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना त्याच दिवशी घरी सोडण्यात आलं होतं.
रुग्णांच्या आरोपानुसार या शस्त्रक्रियेनंतरच त्यांच्या डोळ्यात असह्य वेदना सुरू झाल्या. त्यानंतर डोळ्यातून पाणी वाहू लागलं आणि दिसणंच बंद झालं आहे. रुग्णालयात जाऊन याची तक्रार दिली असता त्यांना घरी पाठवण्यात आलं. त्यामुळेच आम्ही मुख्यमंत्री कार्यालयाचा दरवाजा ठोठावला, असं पीडित रुग्णांनी सांगितलं.
सरकारकडून मिळतो निधीआराध्या आय हॉस्पीटलमध्ये याआधीपासूनच अशा प्रकारचे डोळ्यांची तपासणी करणारे शिबीर घेतले जात आले आहेत. यात रुग्णांवर विनाशुल्क मोतिबिंदूचं ऑपरेशन देखील केलं जातं. यासाठीचा निधी सरकारकडून रुग्णालयाला दिला जातो. सीएमओच्या परवानगीनुसारच डीबीसीएस योजनेअंतर्गत कॅम्प चालवला जात होता.