बिहारची राजधानी पाटणा येथील रेल्वे जंक्शन जवळील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत मोठे नुकसान झाले. या आगीत सहा जणांना होरपळून आपला जीव गमवावा लागला, तर २० जण भाजले आहेत. आग एवढी मोठी होती की काही क्षणातच दुसऱ्या इमारतीपर्यंत पोहोचली. काही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे आग लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींना जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आले.
हॉटेलमध्ये लागलेल्या आगीचा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये आगीचा भडका पाहायला मिळत आहे. आदर्श हॉटेलजवळ लागलेल्या या आगीमुळे सर्वत्र धुराचे सावट पसरले. या घटनेपासून रेल्वे स्थानक केवळ ५० मीटरच्या अंतरावर आहे. आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. इतर काही जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि तीन पुरूषांचा समावेश आहे. अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही. आम्ही अधिक चौकशी करत आहोत. मृतांची ओळख पटल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली जाईल.