उडुपी : हिजाब काढण्यास नकार देणाऱ्या सहा विद्यार्थिनींना कर्नाटकातील एका महाविद्यालयाने मंगळवारपासून प्रवेशबंदी केली. हिजाब घालूनच आम्ही महाविद्यालयात येऊ, अशी भूमिका या विद्यार्थिनींनी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून घेतली आहे.
मंगळवारपासून सुरू होणाऱ्या वर्गांना हजेरी न लावल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा या विद्यार्थिनींना पीयू महाविद्यालयाने दिला होता. मात्र, हिजाब न घालता वर्गात येण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे या विद्यार्थिनींना मंगळवारी महाविद्यालयाच्या संकुलात प्रवेश मिळाला; पण त्यांना वर्गात बसू देण्यात आले नाही.
त्यापैकी अल्मास या विद्यार्थिनीने सांगितले की, आम्ही पीयू महाविद्यालयाच्या संकुलात प्रवेश केला, त्यावेळी तिथे मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त होता. हिजाब घालूनच वर्गात प्रवेश करण्यावर आम्ही ठाम आहोत. हा हट्ट सोडावा, असे महाविद्यालयातील काही प्राध्यापकांनी आम्हाला सांगितले. मात्र, आम्ही यापुढेही हिजाब घालूनच महाविद्यालयात येऊ व वर्गात बसू देण्याची परवानगी मागत राहणार आहोत.मंगळवारी जागतिक हिजाब दिन होता. त्याचेही स्मरण या विद्यार्थिनींनी करून दिले. हिजाब घालून वर्गात प्रवेश देण्यात यावा, त्यातील एका विद्यार्थिनीने न्यायालयातही दाद मागितली आहे. पीयू महाविद्यालयाच्या समितीचे अध्यक्ष व आमदार रघुपती भट हे धमकावत असल्याचा आरोप या सहा विद्यार्थिनींनी केला. (वृत्तसंस्था)
कुंदापूरमध्ये हिजाब विरुद्ध भगवी शालकर्नाटकमधील उडुपीप्रमाणेच कुंदापूर येथील एका महाविद्यालयात काही विद्यार्थिनींनी हिजाब घालूनच वर्गात येऊ अशी भूमिका घेतली. त्याला प्रत्युत्तर म्हणून १०० विद्यार्थ्यांनी भगवी शाल पांघरून महाविद्यालयात प्रवेश केला. या घटनेमुळे महाविद्यालय परिसरात तणाव निर्माण झाला आहे. कुंदापूरच्या स्थानिक नेत्यांनी हा वाद मिटविण्यासाठी घेतलेली बैठक निष्फळ ठरली आहे.