Congress Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra:काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. ईशान्य भारतातून भारत जोडो न्याय यात्रा आता बिहारमध्ये आली आहे. भारत जोडो न्याय यात्रा बिहारमध्ये दाखल होण्यापूर्वीच इंडिया आघाडीला रामराम करत नितीश कुमार यांनी भाजपासोबत सत्ता स्थापन केली. यावरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. भारत जोडो न्याय यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा केला जात आहे. यातच एका लहान मुलाने राहुल गांधी यांना लग्नाबाबत प्रश्न विचारला आहे.
राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा बिहारच्या किशनगंजमध्ये पोहोचली होती. या ठिकाणी एका ६ वर्षाच्या मुलाने राहुल गांधी यांना तुम्ही लग्न कधी करणार, असा प्रश्न विचारला. लहान मुलाच्या प्रश्नावर राहुल गांधी यांनी उत्तर दिले. सध्या मी काम करतोय, ते काम संपल्यावर, असे राहुल गांधी यांनी सांगितले. मात्र, मुलाचा प्रश्न ऐकून राहुल गांधी चकित झाल्याचे म्हटले जात आहे. अर्श नवाज असे या लहानग्याचे नाव असून तो यूट्यूबवर ब्लॉग करतो. अर्शने राहुल गांधींवरही ब्लॉग टाकला असून, ते भावी पंतप्रधान आहेत, असे म्हटले आहे.
राहुल गांधींनी व्हिडिओ केला शेअर
राहुल गांधींनी त्या मुलाचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला आहे. अर्श हा लहानगा राहुल गांधींच्या बससमोर येऊन उभा राहिला. राहुल गांधींनी मुलाला आपल्या मांडीवर बसवले. लहानग्या अर्शने राहुल गांधींसोबत एक ब्लॉग तयार केला. दरम्यान, राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा बिहारमध्ये असून कटिहार, पूर्णिया आणि किशनगंज जिल्ह्यातून ही यात्रा पुढे सरकली आहे.
दुसरीकडे, बिहार दौऱ्यावर असताना राहुल गांधी यांना पाहण्यासाठी समर्थकांची मोठी गर्दी होत आहे. राहुल गांधी यांची बिहारी शैली लोकांना खूप आवडत आहे. राहुल गांधींचा एक फोटोही व्हायरल होत आहे. यामध्ये डोक्यावर टॉवेल बांधून राहुल गांधी खाटेवर बसले आहेत. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईपर्यंत चालणार आहे.