माकडांच्या बुद्धिमत्तेच्या, चातुर्याच्या अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. अनेकदा एखाद्या पर्यटन स्थळी, मंदिरांजवळ, सार्वजनिक ठिकाणी माकडांच्या टोळ्यांकडून घातला जाणारा उच्छाद हा तिथे येणाऱ्यांसाठी त्रासदायक ठरतो. मात्र अशाच एका माकडांच्या टोळक्याने एका सहा वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाच्या प्रयत्न करत असलेल्या इसमाला धडा शिकवल्याची घटना समोर आली आहे.
उत्तर प्रदेशमधील बागपत येथे एका सहा वर्षांच्या विद्यार्थिनीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले. या घटनेनंतर मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई करत अज्ञात आरोपीविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुलीवर जबरदस्ती करणारा आरोपी फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पीडित मुलीच्या आई-वडिलांनी केलेल्या दाव्यानुसार एक इसम त्यांच्या मुलीला फूस लावून घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या निर्जनस्थळी घेऊन गेला. तिथे तो मुलीच्या शरीरावरील कपडे उतरवून तिच्यासोबत गैरवर्तन करण्याच्या प्रयत्नात होता. तेवढ्यात तिढे माकडांची एक टोळी आली आणि त्या माकडांनी आरोपीवर हल्ला केला. त्यामुळे आरोपी घाबरून पळून गेला.
दरम्यान, या घटनेनंतर पीडित मुलगी कशीबशी घरी पोहोचली. तिने तिच्या घरवाल्यांना संपूर्ण घटनाक्रम सांगितला. तसेच माकडांनी तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या इसमापासून तिला कसं वाचवलं, याचं वर्णन केलं. दरम्यान, पीडित मुलीचे वडील म्हणाले की, माझी मुलगी बाहेर खेळत होती. तेव्हा आरोपी तिला घेऊन गेला. जवळच्या सीसीटीव्हीमध्ये तो मुलीला चिंचोळ्या गल्लीत घेऊन गेला. आतापर्यंत आरोपीची ओळख पटलेली नाही. त्याने माझ्या मुलीला जिवे मारण्याची धमकी दिली आहे. जर माकड तिथे आले नसते तर माझी मुलगी आज या जगात नसती.
माकडांमुळे ही मुलगी एका हैवानाची शिकार होण्यापासून बचावली. दरम्यान, आरोपीविरोधात पोलिसांनी भादंवि कलम ७४ आणि कलम ७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आवश्यकता भासल्यास अधिक कलमं जोडली जातील. सध्या आरोपीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.